पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे मागील काही तासांत सव्वा टीएमसी एवढा पाऊस पडला आहे. शहराला महिन्याला सव्वा टीएमसी एवढा पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब मानली जात आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरणात 76 मिमी, पानशेत 147 मिमी, टेमघर 170 आणि वरसगाव 145 मिमी असा पाऊस मागील 13 तासात धरण क्षेत्रात पडला आहे. तर सद्यस्थितीत या चारही धरणात मिळून 57.43 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. आकडेवारीवरून मागील 13 तासात सव्वा टीएमसी एवढा पाणीसाठा धरण क्षेत्रात जमा झाला आहे. यामुळे पुणेकर नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने कालव्यात 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पाण्याच्या विसर्गामध्ये काही तासात वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागामार्फत व्यक्त केली आहे.