शहरच कधी न पाहिलेल्या गडचिरोली नक्षलग्रस्त भागातील ९० विद्यार्थ्यांना पोलिसांनी शनिवारी ‘पुणे दर्शन’ घडविले. शहरातील मोठ-मोठय़ा इमारती, प्रेक्षणीय स्थळे पाहाताना ही मुले हरखून गेली होती. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सपत्नीक या विद्यार्थ्यांसोबत भोजन घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. या विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकताना पोलीस आयुक्तांबरोबर इतर अधिकारीही हेलावून गेले होते.
गृहमंत्री आर.आर. पाटील व पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या कल्पनेतून गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या ९० विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र दर्शनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबई भेटीत शुक्रवारी गृहमंत्र्यांशी गप्पा मारल्यानंतर हे विद्यार्थी शनिवारी पुण्याला आले. पोलिसांनी शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ गणपती, टेल्को कंपनी, आयुका, पुणे विद्यापीठ या स्थळांची सफर घडविली. म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल येथील उपाहारगृहावर विद्यार्थ्यांना दुपारी भोजन देण्यात आले. पोलीस आयुक्तांनी मुलांसोबत गप्पा मारल्या. या मुलांशी गप्पा मारणे हा वेगळा अनुभव असल्याचे पोळ यांनी सांगितले. महाराष्ट्राची औद्योगिक, शैक्षणिक प्रगती, सामाजिक परिस्थिती समजावून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुहास नाडगौडा यांनी सांगितले. पुणे भेटीनंतर सायंकाळी ही मुले पंढरपूरकडे रवाना झाली.
 
पोळी, इडली पहिल्यांदाच पाहिली !
या विद्यार्थ्यांना सकाळच्या न्याहरीमध्ये इडली देण्यात आली होती. पहिल्यांदाच इडली पाहिल्याने ती कशी खायची याची विद्यार्थ्यांना कल्पना  नव्हती. त्यामुळे त्यांनी ती खाल्ली नाही. त्यानंतर त्यांना पोहे देण्यात आले.  तसेच दुपारच्या जेवणामध्ये त्यांना पोळी देण्यात आली असता त्यांनी पोळी पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितले. त्यांनी आतापर्यंत फक्त भात आणि डाळ एवढेच खाल्ले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी पोळी, स्वीट डिश घेतली नाही.