उपमहापौर धेंडे यांच्या हस्ते ‘फूड दोस्ती’चे उद्घाटन

रोज १५,००० लोकांचे भरपेट जेवण होईल एवढे अन्न हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक राहते. ते गरजूंपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे काम आहे. ते करणाऱ्यांना महापालिका पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मंगळवारी दिले.

संवाद सोशल टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे ‘फूड दोस्ती’ या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या सुधारित आवृत्तीचे उद्घाटन डॉ. धेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संवादचे संजीव नेवे, हॉटेल अ‍ॅण्ड केटर्स असोसिएशनचे किशोर सरपोतदार आणि शेफ नीलेश लिमये उपस्थित होते. अ‍ॅपमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे सुमारे १५० हॉटेल व्यावसायिक आणि स्वयंसेवी संस्था एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत.

डॉ. धेंडे म्हणाले, पुरेसे आणि चांगले अन्न मिळणे ही आजही आपल्या देशातील अनेकांसाठी दुर्मीळ गोष्ट आहे. हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक राहिलेल्या अन्नाचे काय करायचे ही त्यांच्यापुढील समस्या आहे. दोन्ही समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘फूड दोस्ती’ हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे महापालिका म्हणून या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल. जास्तीत जास्त हॉटेल व्यावसायिकांनी ‘फूड दोस्ती’ या मोबाइल अ‍ॅपशी जोडून घ्यावे असे आवाहनही डॉ. धेंडे यांनी केले. शेफ नीलेश लिमये म्हणाले, अनेक मोठय़ा शहरांमध्ये रोज शिजणाऱ्या अन्नापैकी बरेचसे अन्न वाया जाते. हे होऊ नये म्हणून हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांनीही जागरूक होण्याची गरज आहे. तसेच ‘फूड दोस्ती’सारख्या माध्यमातून हे अन्न कचऱ्यात न जाता गरजूंच्या पोटी मिळाले तर ते महत्त्वाचे ठरेल.

या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या निमित्ताने जान्हवी फाउंडेशन, इंटरनॅशनल लेप्रसी युनियन, वसंतराव जाधव वेल्फेअर फाउंडेशन, स्पर्श बालग्राम अशा स्वयंसेवी संस्था आणि हॉटेल व्यावसायिक एकमेकांशी जोडले गेले आहेत. संवादचे संस्थापक संजीव नेवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि ‘फूड दोस्ती’ची भूमिका विशद केली.

रॉबिनहूड आर्मीचे सहकार्य

हॉटेल्स, मंगल कार्यालये अशा ठिकाणी शिल्लक राहणारे चांगले अन्न एकत्र करून ते गरजू मुले किंवा स्वयंसेवी संस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात रॉबिनहूड आर्मी, अन्नदूत सारखे गट काम करत आहेत. त्यासाठी लागणारा संपर्क आणि यंत्रणाही या गटांकडे तयार आहे. ‘फूड दोस्ती’च्या कामात या गटांचेही सहकार्य घेतले जाईल, असे अन्नदूतचे संस्थापक आणि हॉटेल आणि केटर्स असोसिएशनचे किशोर सरपोतदार यांनी सांगितले.