पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू, आळंदी विकास आराखडय़ांतर्गत राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला.

देहू, आळंदी भंडारा डोंगर विकास आराखडय़ांतर्गत स्थानिक प्रशासन आणि विविध विभागांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही विकासकामे करण्यात आली आहेत. स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वारी या त्रिसूत्रीनुसार सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. रस्ता रुंदीकरण, नवे पदपथ, बाह्य़वळण मार्ग, वाहनतळ सुविधा, सुलभ शौचालय आणि पालखीतळ सुविधा विकास अशा प्रकारची कामे प्रामुख्याने पूर्ण करण्यात आली आहेत.

देहू, आळंदी आणि भंडारा डोंगर परिसरात एक हजार कोटींची विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये देहूत ३२, आळंदीमध्ये ३४ आणि भंडारा डोंगर आणि सदुंबरे परिसरात प्रत्येकी सहा विकासकामांचा समावेश आहे. देहू विकास आराखडय़ामध्ये १८० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य घाटाचे पुनर्निर्माण, गाथा मंदिर परिसर आणि घाटाचे पुनर्निर्माण, भक्तनिवास आणि वैकुंठ गमन मंदिर परिसराचा पुनर्विकास, रस्ता रुंदीकरण, पदपथ, गावांमधील रस्त्यांवरुन भाविकांसाठी सुरक्षित पायी चालण्याची सुविधा, त्यासाठी प्रशस्त बाह्य़वळण मार्ग, शौचालये आणि आरोग्य सुविधा केंद्रे आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प आदींचा समावेश आहे. तर, आळंदी परिसरात दोनशे कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा दर्शन स्थळ परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला असून, तेथे रुंदीकरण, प्रशस्त पदपथ विकसित केले आहेत. सिद्धबेट परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, तेथे नदीकिनारी चालण्याकरिता विशेष मार्ग तयार करण्यात आला आहे.

याबरोबरच जड वाहने बाह्य़वळण मार्गाने वळवण्यात आल्याने, गावातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. आळंदी गावाच्या दोन्ही बाजूला पूल बांधून वाहतूक वळवण्याचे नियोजन केले असून वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी परिसराला पिण्याच्या पाण्यासाठी विशेष प्रकल्प उभारण्यात आला असून तो लवकरच कार्यान्वित होणार आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

पुण्याकडून देहू, आळंदी परिसरात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन देखील सुलभ वाहतुकीची सोय करण्यात आली आहे. या मार्गावरील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले असून विश्रांतवाडी भागातून आठ पदरी प्रशस्त मार्गाद्वारे आळंदी, देहू परिसरात जाणे शक्य झाले आहे. देहू, आळंदी, भंडारा परिसर विकास प्रकल्पांतर्गत योजना पूर्णत्वास नेताना भाविकांना सोयीसुविधा देणे, त्यांची सुरक्षा याला प्राधान्य देण्यात आले आहे. काही विकासकामांत भूसंपादनाबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या लवकरच दूर करुन संपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास आहे.     – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री