राज्याप्रमाणेच पुणे विभागाच्या निकालातही यावर्षी घसरण झाली असून निकाल ८७.२६ टक्के लागला आहे. यावर्षीही पुणे विभाग राज्यात चौथ्या स्थानावर आहे. मात्र, शंभर टक्के निकाल लागलेली सर्वाधिक महाविद्यालये पुणे विभागातच आहेत.

बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. पुणे विभागाचा निकाल ८७.२६ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात घसरण झाली आहे. राज्यात पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर घसरला असला तरी शंभर टक्के निकाल लागलेली सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालयेही पुणे विभागात आहेत. पुणे विभागांत १०१ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यातील साधारण १३ महाविद्यालये पुणे शहरातील आहेत, तर ९ महाविद्यालये पिंपरी-चिंचवडमधील आहेत. विभागांत ५ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

पुणे विभागात पुणे, नगर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्य़ांचा समावेश होतो. यावर्षी निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. यावर्षी विभागात २ लाख १८ हजार २३३ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  त्यातील १ लाख ९० हजार ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८६.२६ आहे. दरवर्षी  प्रमाणेच याहीवर्षी विभागात  मुलींची सरशी झाली आहे. विभागातील ९२.३० टक्के विद्यार्थिनी आणि  ८३.४३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  गेल्यावर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल घटला असून गेल्यावर्षी ९१.९६ टक्के निकाल लागला होता. विभागातील ३२.२० टक्के पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालाची उत्सुकताही कमी

यावर्षी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता असणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेसाठी बारावीचा निकाल गृहीत धरण्यात येणार नसल्यामुळे एकुणात निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्येही कमी दिसली. त्यातच मोबाईलवर निकाल पाहता येत असल्यामुळे सायबर कॅफेमध्येही फारशी गर्दी दिसून आली नाही.