News Flash

पर्यटनस्थळी भटकंती करताना अतिउत्साह नको

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार

पुणे : पुणे जिल्ह्य़ात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. या ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. लोणावळा, खंडाळा, लोहगड, पवना धरण परिसर, सिंहगड, मढेघाट आदी ठिकाणी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

दीर्घ कालावधीनंतर मोसमी पावसाने शहरासह जिल्ह्य़ात जोरदार हजेरी लावली आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्यटन स्थळांवर सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन जीव गमावल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडतात. या पाश्र्वभूमीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथे सीमाभिंत कोसळून कामगार मृत्युमुखी पडल्याच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणे शोधून तेथे कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी गर्दी होते. या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल आणि त्या ठिकाणी पाऊस, दाट धुके असेल तर स्थानिक गावातील एखादा मार्गदर्शक सोबत न्यावा. पाऊस मोठय़ा प्रमाणावर पडत असल्याने दाट धुके असल्यास गाडीचे दिवे आणि पार्किंग दिवे चालू ठेवून गाडी चालवावी. पर्यटनस्थळी सुरक्षारक्षक भिंती, लोखंडी कडे नसल्याने धबधब्याच्या प्रवाहात उतरू नये, सर्व पर्यटकांची सायंकाळी चार वाजण्यापूर्वी परतीच्या प्रवासाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

रस्ते अरुंद असल्याने आपली वाहने रस्त्यावर लावू नयेत. रस्त्यावर अचानकपणे चिखल होणे, दरड कोसळणे, रस्ता निसरडा होणे हे प्रकार होऊ शकतात. त्या दृष्टीने वाहने चालवावीत. जे वाहन चालक या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पर्यटकांनी लक्षात ठेवावे..

भुशी धरणात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. लोहगड भागात पावसाळ्यात धुके पसरलेले असते. तसेच वाढलेल्या गवतांमुळे पायवाटा झाकल्या जातात. परिणामी नवखे पर्यटक, गिर्यारोहक या भागात वाट चुकण्याची शक्यता असते. माळशेज घाट परिसरात अनेक धबधबे असून धबधब्याच्या पाण्यात उतरल्याने किंवा घाटात अपघात होण्याची शक्यता आहे. वेल्हा ते मढेघाट रस्ता डोंगर दऱ्यांमधून जात असून वेडीवाकडी वळणे, तीव्र उतार आणि चढ असणारा हा रस्ता आहे. तसेच मढेघाट ते वेल्हा या परिसरामध्ये पाऊस मोठय़ा प्रमाणात पडत असून दाट धुके असते. अशा ठिकाणी दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

संकटकाळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

जिल्ह्य़ात संकटकाळी १०७७ या टोल फ्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२०-२६१२३३७१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षात नऊ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून हा कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 3:37 am

Web Title: pune district administration instructed to provide care to tourists zws 70
Next Stories
1 शहरबात पिंपरी : शासकीय यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनजीवन विस्कळीत
2 सेवाध्यास : दीपस्तंभ
3 ‘लोकसत्ता’च्या रेश्मा शिवडेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार
Just Now!
X