महाविद्यालयांमधून दीड लाख नोंदणी

आगामी २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया शहर आणि जिल्ह्य़ातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आली. गेल्या वर्षी पदवी अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतानाच अठरा वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नावनोंदणी करण्यात आली. त्यामध्ये विविध महाविद्यालयांमधून १ लाख ३ हजार २२१ नवमतदारांची ऑनलाइन नावनोंदणी झाली असून सुमारे ५० हजार अर्ज ऑफलाइन आले आहेत. अशी एकूण दीड लाखांपेक्षा अधिक नावनोंदणी झाली आहे. राज्यभरात पुणे जिल्ह्य़ाने महाविद्यालयांमधून नावनोंदणी करण्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शहर आणि जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये १८ ते २१ वयोगटातील नवमतदारांसाठी मतदारनोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी जुलै २०१७ मध्ये विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. तसेच १२२ महाविद्यालयांमध्ये मतदारनोंदणी केंद्र उभारण्यात आले होते. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबरोबरच मतदारनोंदणी करुन घेण्याबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडून सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच शंभर टक्के मतदारनोंदणीसाठी महाविद्यालयांकडून निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांची मतदारनोंदणी यापूर्वीच झाली होती, त्यांची माहिती प्रवेश अर्जाबरोबर जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नावनोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्येच निवडणूक ओळखपत्र देण्याची सुविधा देण्यात आली होती. या मतदारनोंदणीबाबत शहर आणि जिल्ह्य़ातील महाविद्यालये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ यांच्या प्राचार्याबरोबर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली.

शहर आणि जिल्ह्य़ातील २३ मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणीची मोहीम घेण्यात आली.  विद्यालयनिहाय सुमारे ७ हजार ४६९ संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. अशा सर्व प्रयत्नांमुळे महाविद्यालयांच्या माध्यमातून दीड लाखांपर्यंत नवमतदारांची नोंदणी करण्यात आली असून यामध्ये राज्यात पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

मोनिका सिंह, उप जिल्हा निवडणूक अधिकारी