सहा कोटी ५९ लाखांची निविदा; पायाभूत सुविधांवर भर, पर्यटन विकास महामंडळाकडे विकास निधी वर्ग

ऐतिहासिक वारसा असलेल्या रोहिडा, रायरेश्वर, पारवडी या जिल्ह्य़ातील तीन किल्लय़ांच्या विकास कामांसाठी ६ कोटी ५९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. लवकरच या किल्लय़ांवर विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यत किल्लय़ांची संख्या मोठी असून तरुणाई व दुर्गप्रेमी किल्ल्यांना भेट देत असतात. दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असताना किल्ले आणि परिसरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने या किल्लय़ांचा विकास करण्याची मागणी सातत्याने होत होती. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) निधी वर्ग केला आहे.

जुन्नर येथील शिवाजी पुतळा ते शिवनेरी पायथा या दरम्यान पथदिवे बसवण्यासाठी ८५ लाख ५४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ओझर गणपती देवस्थान परिसरात विकास कामे करण्यासाठी ५९ लाख १२ हजार रुपये मंजूर केले आहेत. किल्लय़ांच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून एमटीडीसीने रोहिडा किल्लय़ासाठी १ कोटी ३१ लाख ८० हजार, रायरेश्वर किल्लय़ासाठी १ कोटी ६४ लाख ६५ हजार आणि पारवडी किल्लय़ासाठी ३ कोटी ६२ लाख ८७ हजार अशा एकूण ६ कोटी ५९ लाख ३२ हजार रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.

दरम्यान, बारामती तालुक्यातील पारवडी येथील शिवकालीन किल्लय़ाची विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढला आहे. त्यात पदपथ आणि वृक्षारोपण, संग्रहालय आणि प्रेक्षागृह, पर्यटक निवास आणि उपाहारगृह, तंबूनिवास आणि किल्ल्याभोवतीचे आवार, नौकानयन, वाहनतळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृह, बागबगिचा आणि त्यातील बैठक व्यवस्था, बैलगाडी सफर आणि रस्ते, पालखी मार्ग आणि अंतर्गत रस्ते, घाट आणि दगड  बसवणे अशी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे.

एमटीडीसीकडून रोहिडा, रायरेश्वर आणि पारवडी या किल्लय़ांचा विकास करण्यात येणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षांत एकूण १०३ कोटी ९७ लाख ८ हजार एवढय़ा निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील २७ कोटी २९ लाख ६५ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. रोहिडा, रायरेश्वर आणि पारवडी किल्लय़ांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यतील भुदरगड  किल्ला, खेडगे धबधबा आणि कागल येथील रामलिंग मंदिराच्या विकास कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. एमटीडीसीकडून जिल्ह्यतील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी  वाहनतळ, स्वच्छतागृह, माहिती, सूचना आणि दिशादर्शक फलक, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ