मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कारवाई

पुणे : रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आणि पकडल्या जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केलेल्या कारवाईमध्ये यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत सुमारे ७१ हजार फुकटे प्रवासी पकडले. त्यांच्याकडून चार कोटी रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे.

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सध्या प्रवासी आणि गाडय़ांची संख्या झापाटय़ाने वाढते आहे. एकटय़ा पुणे रेल्वे स्थानकाची आकडेवारी पाहिल्यास स्थानकामध्ये दररोज अडीचशेहून जास्त गाडय़ांची ये-जा असते. पुणे- लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकल गाडय़ा आणि पुणे-दौंड मार्गावरील डेमू गाडय़ांमध्येही प्रवाशांची संख्या अधिक आहे. काही वेळेला स्थानकात गाडी उभी करण्यासही जागा उपलब्ध होत नाही. पुणे स्थानकासह विभागातील सर्वच स्थानकांची व्यस्तता वाढत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना विनातिकीट किंवा योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे.

फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याला या कारवाईचा आढावा घेतला जातो. पुणे विभागाकडून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत पुणे ते मळवली, पुणे ते बारामती, पुणे ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर आदी मार्गावर तिकिट तपासणीची मोहीम राबविली. त्यात विविध प्रकारच्या नियमबातेमुळे १ लाख ५३ हजार ६२८ प्रकरणांत ७ कोटी ७७ लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे ७१ हजार होती. त्यांच्याकडून ४ कोटींचा दंड घेण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत १ लाख ४० हजार ३७१ प्रकरणांत ६ कोटी ७७ लाखांची वसुली केली होती.

दंड न दिल्यास तुरुंगवास

फुकटय़ा प्रवाशांना पकडण्याबरोबरच योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे योग्य तिकीट घेऊनच रेल्वेतून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तिकीट तपासणीदरम्यान पकडले गेल्यास रेल्वेच्या नियमानुसार दंड भरावाच लागणार आहे. दंड न भरल्यास संबंधित प्रवाशाला रेल्वेच्या कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षाही केली जाऊ शकते, असा इशाराही रेल्वेने दिला आहे.