दिवाळी म्हटलं की खमंग चिवडा, खुसखुशीत चकली आणि कडबोळी, मोतीचूर लाडू, रवा आणि बेसन लाडू, अनारसे, गोड आणि खाऱ्या शंकरपाळ्या अशा फराळाच्या पदार्थाची रेलचेल असते. हा दिवाळीचा फराळ देशभरात सर्वत्र तर पाठविला जातोच, पण परदेशातील मराठी कुटुंबीयांकडूनही फराळाच्या पदार्थाना मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कुरीअर कंपन्यांची सेवा गतिमान झाल्यामुळे पुण्यातून यंदा जगभरातील विविध देशांमध्ये फराळ रवाना झाला आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १४ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

गेल्या दशकापासून दिवाळी फराळ देशभरात सर्वत्र जात आहे. मात्र, पाच वर्षांपासून परदेशातून फराळाच्या पदार्थाना मागणी वाढत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया आणि दुबई या देशांमधून फराळाची मागणी होत आहे. या वर्षी चिवडा, चकली, बेसन लाडू असा तयार फराळ मोठय़ा प्रमाणावर परदेशात रवाना झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली.

महिला बचत गटांच्या फराळाला परदेशातून मागणी वाढली आहे. फराळाचे पार्सल कुरीअर कंपन्यांच्या सहकार्याने परदेशात पाठविले जात आहे. काही कुरीअर कंपन्यांनी केटर्सकडे फराळाच्या पदार्थाची आगाऊ नोंदणी केली आहे. साधारणपणे तीन ते पाच किलो वजन असलेल्या फराळाचे बॉक्स पाठविले जात आहेत. त्यामध्ये शुगर फ्री आणि लो कॅलरी असलेल्या फराळाला तेवढीच मागणी आहे. प्रतिकिलो सहाशे रुपये असा पार्सल पाठविण्याचा दर आकारला जात आहे. आंतरराष्ट्रीय कुरीअर सेवा गतिमान झाल्यामुळे पुण्यातून अवघ्या तीन-चार दिवसांत परदेशात ज्याला फराळ पाठविला जातो त्याला तो घरपोच दिला जातो, असे सरपोतदार यांनी सांगितले.