मुक्ता बर्वेच्या कानपिचक्यानंतर महापालिकेला जाग

प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने दिलेल्या कानपिचक्यांनंतर शहरातील महापालिकेच्या नाटय़गृहांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छतेपासून मुक्त आणि चकाचक झाली आहेत. सर्व नाटय़गृहांमध्ये स्वच्छता आणि टापटीप याला प्राधान्य दिले जात आहे. सफाईकामाच्या कंत्राटाचे करार संपुष्टात आले असल्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आता नाटय़गृहांच्या स्वच्छतागृहांच्या सफाईकामाची जबाबदारी येऊन पडली आहे.

शहरातील सर्वच नाटय़गृहांमधील अस्वच्छता, िवगेत साठलेला कचरा, अस्वच्छ मेकअप रूम आणि स्वच्छतागृहे, कानाकोपऱ्यात पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांचा लाल रंग असे चित्र होते. यासंदर्भात वारंवार टीका होऊनही परिस्थितीमध्ये फारसा बदल घडला नव्हता. मात्र, कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबद्दल अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने पंधरा दिवसांपूर्वी समाज माध्यमाद्वारे छायाचित्रांसह वास्तव प्रकाशात आणले. त्यानंतर लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि युद्धपातळीवर या नाटय़गृहातील स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली. सफाई कामगार कामावर नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असून ‘याला बेजबाबदारपणा म्हणायचा की उद्दामपणा’ असा प्रश्न प्रशासनाला विचारला होता. अनेक महिन्यांपासून या नाटय़गृहात सफाई कामगार नाहीत. त्याच्या निविदेवर कोणाची तरी सही नसल्याचे कारण पुढे केले जात आहे, असे मुक्ता बर्वे हिने फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते.मुक्ता बर्वे हिने आवाज उठवल्यानंतर लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले

मुक्ता बर्वे हिने आवाज उठवल्यानंतर लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि युद्धपातळीवर स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या नाटय़गृहांची स्वच्छता हा प्रश्न ऐरणीवर आला. या कानपिचक्यांनंतर शहरातील सर्वच नाटय़गृहांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छतेपासून मुक्त झाली आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी नाटय़गृहांची पाहणी करून अनावश्यक वस्तू, अडगळीचे सामान हटविण्याबाबत प्रशासनाची कानउघाडणी केली. त्यानंतर शहरातील सर्वच नाटय़गृहांमध्ये जास्तीत जास्त काळजी घेऊन स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे.

सफाईच्या निविदेला लवकरच मान्यता

शहरातील बहुतांश नाटय़गृहांच्या सफाईकामाची कंत्राटे ज्यांच्याकडे आहेत त्या संस्थांचे करार संपुष्टात आले आहेत. सफाईकामाच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून हा प्रस्ताव स्थायी समितीकडे गेला आहे. स्थायी समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर नाटय़गृहांच्या अस्वच्छतेचा प्रश्न लवकरच संपुष्टात येईल, असे रंगमंदिर व्यवस्थापक प्रकाश अमराळे यांनी सांगितले. सध्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी नाटय़गृहांच्या सफाईचे काम करीत असून त्याला प्राधान्य देण्यात आले आहे. महापौरांनी केलेल्या सूचनेनुसार अनावश्यक वस्तू, अडगळीचे सामान आणि स्वच्छता या बाबींकडे लक्ष देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.