पुणे जिल्ह्यात बुधवार २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच मुसळधार पावसाची वर्तवण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या (शुक्रवार) पाच तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना उद्या सुट्टी घोषित केली गेली  आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना काल रात्री धुवांधार पावसाचा फटका बसला. शहरांसह ग्रामीण परिसरातील सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले, नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४ जण दगावले असून ९ जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची ५ पथके कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी १८० टक्के पाऊस झाला असल्याचे म्हणत, कालच्‍या पावसामुळे जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पुणे शहरातील ६, हवेली तालुक्यातील ६, पुरंदर तालुक्यातील २ जणांचा समावेश असल्याची त्यांनी माहिती दिली.