प्रभाग क्र. 10

चार विद्यमान नगरसेवक, तीन ते चार इच्छुक माजी नगरसेवक, त्यातही काही पालकमंत्री गिरिश बापट यांचे कट्टर समर्थक अशा राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी कोणाला मिळणार यावरून प्रभाग क्र. १५ मधील (शनिवार-सदाशिव) राजकारण जोरात चालले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची छुपी आघाडी होणार, तिकिट न मिळाल्यास गेल्यावेळी प्रमाणे यंदाही भाजपमध्ये बंडखोरी होणार इथपासून ते एका नगरसेवकाला दुसऱ्या प्रभागातून उमेदवारी मिळणार, अशा चर्चा या प्रभागाबाबत सुरू आहेत. प्रभागातील पुरुषांच्या एका खुल्या जागेसाठी भाजप नेतृत्त्वाला येथे तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

नव्याने तयार झालेला प्रभाग क्रमांक १५ हा भाजपच्या चार विद्यमान नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग झाला आहे. विद्यमान नगरसेवक दिलीप काळोखे यांचा सध्याचा प्रभाग क्रमांक ५० कायम राहताना नगरसेवक हेमंत रासने आणि मुक्ता टिळक, अशोक येनपुरे आणि प्रतिभा ढमाले यांच्याबरोबर धनंजय जाधव आणि मनिषा घाटे यांच्या प्रभागातील काही भाग या प्रभागाला जोडण्यात आला आहे. महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी एक खुली जागा तर ओबीसी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी एक जागा असे आरक्षण येथे आहे.

खुल्या गटातून अशोक येनपुरे आणि दिलीप काळोखे यांच्यात स्पर्धा आहे. हे दोघेही बापट समर्थक आहेत. येनपुरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या प्रभागाचा काही भाग प्रभाग १५ ला जोडण्यात आला आहे. तर कोळोखे यांचा प्रभाग कायम राहिल्यामुळे त्यांनाच संधी मिळेल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. येनपुरे यांना संधी द्यायची झाल्यास प्रभाग क्रमांक १८ मधून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळही बांधली जात आहे. महिलांच्या खुल्या गटातही इच्छुकांची तीव्र स्पर्धा असली, तरी नगरसेविका मुक्ता टिळक यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रभागाची रचना झाल्यानंतर टिळक यांना मॉडेल कॉलनी प्रभागातून संधी द्यावी यासाठी पक्षात हालचाली सुरू झाल्या होत्या.

महिलांच्याच ओबीसी जागेसाठी मनसेच्या रूपाली पाटील भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास उत्सुक होत्या आणि पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केल्याचे सांगितले जात होते. मात्र ही चर्चा आता मागे पडली आहे. पुरुषांच्या ओबीसी गटातून हेमंत रासने इच्छुक आहेत. आरक्षणाची परिस्थिती लक्षात घेता पुरुषांच्या ओबीसी गटातून रासने आणि महिलांच्या खुल्या गटातून मुक्ता टिळक हेच पक्षाचे उमेदवार असतील अशी शक्यता अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हे दोन्ही पक्ष या प्रभागात तुलनेने कमकुवत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर गेल्या वेळी राघवेंद्र मानकर यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या पेचामध्ये आणखी भर पडली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमध्ये निवडणुकीसाठी आघाडी झाली नाही तरी छुपी आघाडी करण्याची तयारीही या प्रभागात सुरू झाली आहे.