फेसबुकवर ओळख निर्माण करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्याशी जवळीक साधून विश्वास संपादन केला. शारीरिक संबंधीत ठेवत त्याचे नकळत फोटो काढून बलात्काराचा गुन्हा पोलिसात दाखल करेन अशी धमकी देत वारंवार लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनिया उद्देश मेहरा हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनिया उद्देश मेहरा ही तरुणी पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात राहते. तिने फेसबुकच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या पतीला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझी परिस्थिती बेताची आहे, वडील नाहीत अस म्हणत सहानुभूती मिळवली. मला नोकरीची गरज आहे मला नोकरी मिळवून द्या अस म्हणून जवळीक साधली. पीडित तरुणांकडे पैसे मागितले त्यांनी देखील डोळे झाकून हवी ती रक्कम दिली.ते पैसे आरोपी सोनियाने परत केल्याने तिच्यावर पीडित तरुणाचा विश्वास बसला.असे त्यांच्यात अनेकदा पैश्याचे व्यवहार झाले.तिने एके दिवशी पीडित तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने हॉटेलवर बोलवत शारिरीक संबंध प्रस्थापित केले, त्याचे न कळत फोटो घेतले आणि काही दिवसांनी धमकी देण्यास सुरुवात झाली.

पीडित तरुणांकडून वेळोवेळी तब्बल ४ लाख रुपये तर वाढदिवसाला दुचाकी गिफ्ट म्हणून घेतली. बलात्कार केल्याची ती धमकी देत असल्याने तरुण हतबल झाला होता. पत्नीला सांगून तुझी पोलखोल करते अस देखील ती म्हणत होती. त्यामुळे अखेर कंटाळून तरुणाने मोबाईल बंद ठेवला, तेव्हा फिर्यादी पत्नी च्या नंबरवर फोन आला आणि सर्व घटना समोर आली. पत्नीने सर्व हकीकत चिखली पोलीस ठाण्यात सांगितली आरोपी सोनिया पैसे घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत यांच्यासह महिला पोलीस प्रतीक्षा शिंदे आणि पोलीस हवालदार गरजे यांनी सापळा लावून आरोपी सोनियला अटक केली. सोनियाने अनेक तरुणांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत आर्थिक फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत करत आहेत.