पतियाळा घराण्याच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचा ‘उषा संगीत की नई किरण’ हा कार्यक्रम आणि पं. रोणू मुजूमदार आणि सहकाऱ्यांचा ‘व्हायब्रेशन’ कार्यक्रम हे यंदाच्या २६ व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे खास आकर्षण आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, चित्रपट अभिनेते अनिल कपूर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील आणि उपमहापौर बंडू गायकवाड या वेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात ‘डिव्होशनल महाराष्ट्र’ हा नृत्य-संगीताचा कार्यक्रम, गोवा कला अकादमीच्या कलाकारांचा विशेष कार्यक्रम, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी गणेश वंदना सादर करणार असून ‘राधा कैसे न जले’ या गीतावर अभिनेत्री ग्रेसी सिंग यांचा नृत्याविष्कार होणार असल्याची माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि मुख्य समन्वयक कृष्णकांत कुदळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. जगोबादादा तालीम मंडळास प्रतापराव गोडसे स्मृती जय गणेश पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर ऊर्दू मुशायरा होणार आहे. ६ सप्टेंबरला कौशिकी चक्रवर्ती यांचा, तर ७ तारखेला रोणू मुजूमदार यांचा कार्यक्रम होणार आहे.
ढोल-ताशा ध्वज स्पर्धा, समन्वय सरकार आणि देवप्रिया अधिकारी यांची गायन-सतार जुगलंबदी, केरळोत्सव, इंद्रधनू, उगवते तारे, ‘नटखट अप्सरा’ हा लावणी महोत्सव, ‘डू अॅण्ड मी’, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ आणि ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ ही मराठी नाटके, महिला महोत्सव, हास्यधारा, एकपात्रींचा हास्योत्सव, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ ‘रंगारंग फू बाई फू’, महिला चित्रकारांचे प्रदर्शन, यांसह वसंत बापट, वसंतराव देशपांडे, वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गीतांवरील ‘वसंत बहार’ असे विविध कार्यक्रम फेस्टिव्हमध्ये होणार आहेत.

‘..तर पुण्यामध्ये मेट्रो आणली असती’
मी खासदार असतो तर, पुण्यामध्ये मेट्रो आणली असती, असे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी सांगितले. मेट्रोसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. केंद्रीयमंत्री कमलनाथ आणि शरद पवार यांच्यासमवेत बैठक घेतली होती. मात्र, सध्या त्यात काय राजकारण आहे, हे माहीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाने मला निलंबित केले आहे. त्यामुळे विधानसभेला सक्रिय होण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी सांगितले. फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री आणि महापौरांना निमंत्रित करणार आहे. मात्र, गेल्या वर्षी महापौर आल्या नव्हत्या. त्यामुळे उपमहापौरांना ‘स्टँड-बाय’ ठेवले आहे, असेही कलमाडी यांनी सांगितले.