पुण्यातील नेहमी गजबलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटला आगीची नजर लागली. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने फॅशन स्ट्रीट क्षणार्धात कवेत घेतलं आणि बघता बघता आगीच्या लोळांनी कापडाची दुकानं व गोदामानं वेढा घातला. साडेतीन तास सुरू असलेल्या या महाभंयकर अग्नितांडवात साडेचारशे दुकानांचा कोळसा झाल्याने फॅशन स्ट्रीटची राखरांगोळीच झाली आहे.

महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत आगीने मार्केटमधील शेकडो दुकानं कवेत घेतली होती. आगीचे मोठं मोठे लोळ आकाशाच्या दिशेनं जाताना दिसत होते.

अरूंद रस्त्यावरून वाट काढत घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरूवात केली. तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजेच मध्यरात्री १ वाजता आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. “रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर ५० जवान आणि १६ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. रात्री १ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत फॅशन स्ट्रीट मार्केटमधील ४४८ छोटी मोठी दुकानं जळून भस्मसात झाली,” अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी माध्यमांना दिली.