केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटणार

चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी चौदा हेक्टर जागेपैकी साडेपाच हेक्टर जागा पुणे महापालिकेने संपादित केली आहे. उर्वरित साडेआठ हेक्टर संरक्षण विभागाची जागा ताब्यात घेण्याचे बाकी असून आयुक्त आणि महापालिकेने त्यात लक्ष घालून जागा संपादित करावी. ऐंशी टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करायचे नाही, असा नियम माझ्या खात्यामध्ये केला आहे. मात्र, चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश आजच ठेकेदाराला देण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.

नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांतील कार्यकाळात करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार या वेळी उपस्थित होते. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम, पीएमआरडीएकडून करण्यात येणाऱ्या प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाची निविदा काढली असून कार्यारंभ आदेश दिला आहे. या कामासाठी चौदा हेक्टर जागा पुणे महापालिकेला संपादित करायची आहे. त्यापैकी आतापर्यंत साडेपाच हेक्टर जागा संपादित झाली असून उर्वरित साडेआठ हेक्टर जागा महापालिकेने संपादित करायची आहे. ऐंशी टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करायचे नाही, असा नियम माझ्या खात्यामध्ये करण्यात आला आहे. मात्र, चांदणी चौकाच्या उड्डाणपुलासाठी नेमलेल्या ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश आजच देण्यात येतील. मात्र, उर्वरित जागेचे भूसंपादन तातडीने करण्याची महापालिकेला आणि आयुक्तांना विनंती आहे. उर्वरित भूसंपादन करायची जागा संरक्षण विभागाची असून या कामात एकूण एक उन्नत मार्ग, दोन उड्डाणपूल आणि एक भूमिगत मार्ग आहे. हे काम सुरू झाल्यानंतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही गडकरी यांनी या वेळी बोलताना दिली.

माझे खाते टप्प्याटप्प्याने काम करत नाही

पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्याबाबत गडकरी म्हणाले,की पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) तेवीस हजार कोटी रुपयांचा वर्तुळाकार रस्ता प्रस्तावित आहे. रस्ता उभारणीसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) दहा हजार कोटी रुपये देऊ. तसेच या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी एनएचएआयऐवजी पीएमआरडीएला स्वतंत्र कंपनी म्हणून मान्यता दिली आहे. भूसंपादनासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करुन दिल्यास तातडीने काम सुरू करु. माझे खाते टप्प्याटप्प्याने काम करत नाही. भूसंपादन होण्याच्या आधी कामे सुरू केल्यास न्यायालयात, हरित लवादात जाऊन स्थगिती आणण्यात येते, त्यानंतर अनेक वर्षे प्रकल्प रखडतात. त्यामुळे आधी भूसंपादन करून मग कामे करावीत. मात्र, टप्प्याटप्प्याने काम करण्याची पालकमंत्री बापट यांची इच्छा असल्यास माझी हरकत नाही. जमीन उपलब्ध करुन दिल्यास दीड वर्षांत रिंगरोड पूर्ण करु.