20 November 2019

News Flash

पुणे : फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट; 11 वर्षीय नातवामुळे वाचले सहा जणांचे प्राण

रात्री पावणे दोनच्या सुमारास तहान लागल्यामुळे नातू पाणी पिण्यासाठी उठला, त्याने...

11 वर्षीय नातवाने आजोबासह कुटुंबातील सहा जणांचे प्राण वाचवल्याचे समोर आले आहे. रात्री पावणे दोनच्या सुमारास तहान लागल्यामुळे नातू पाणी पिण्यासाठी उठला. त्याने फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट होऊन आग लागली. प्रसंगावधान दाखवत तो धावत पळत गेला अन् सर्वांना जागं केलं. तातडीने सर्व जण राहत्या घराच्या बाहेर पडल्याने प्राण वाचले. ‘मॅक्स पॉल चाबुकस्वार’ असं 11 वर्षीय नातवांचे नाव आहे. घराच्या मध्यभागी असलेल्या किचनला मोठी आग लागली होती. आगीत तब्बल दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना कासारवाडी येथील सागर हाईट्स येथे आज घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी आग आटोक्यात आणली.

सविस्तर माहिती अशी की, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर असलेल्या सागर हाईट्स इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. शाळेला सुट्टी लागल्याने कदम यांचे नातू, मुलगी आणि जावई आले होते. रात्री उशीरा सर्व जण गाढ झोपेत होते. नातू मॅक्स हा रात्री उशिरा पाणी पिण्यासाठी झोपेतून उठून फ्रीजकडे गेला, त्याने फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट झाला. त्याने क्षणांचा विलंब न करता धावत पळत तो आई वडिलांसह आजोबांकडे गेला. त्यांनीही घरात न थांबता तातडीने घरातील विजेचे मुख्य बटन (स्विच) बंद करून बाहेर पडले. घरात मोठी आग लागली होती. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. तुकाराम नगर, भोसरी येथील अग्निशमन केंद्राच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अरुंद रस्त्यामुळे वाहन इमारती पर्यंत घेऊन जाण्यास प्रचंड अडचणी आल्या अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. गंभीर बाब म्हणजे इमारतीच्या पाचव्या मजल्यावर अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली नव्हती.

अर्धातास शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या यश आले. दरम्यान, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले, असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. फ्रीज कॉम्प्रेसर मधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळं नागरिकांनी रात्री झोपताना गॅस गळती तर होत नाही ना याची खात्री करावी असं आवाहन अग्निशमन अधिकारी यांच्याकडून करण्यात आलं आहे. सदरची कामगिरी अग्निशमन अधिकारी अशोक कानडे, फायरमन लक्ष्मण ओवाळे, अमोल चिपळूणकर, बाळकृष्ण भोजने, कैलास डोंगरे, मोहन चव्हाण, महेश चौधरी, वाहन चालक देवा जाधव, प्रमोद जाधव शंकर ढाकणे, असे एकूण दहा कर्मचाऱ्यानि जीवाची बाजी लावून केली आहे.

First Published on May 19, 2019 11:20 am

Web Title: pune fridge blast six family members survived due to alertness of 11 year kid
Just Now!
X