पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठ्या थाटात सुरूवात झाली असून पुणेकर ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. मिरवणुकीमध्ये रांगोळ्यांच्या पायघड्यांनी पुण्यातील रस्ते सजून गेले आहेत.
मानाचा पहिला अर्थात कसबा पेठच्या गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले असून त्यापाठोपाठ मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाचेही विसर्जन झाले आहे.
सानेगुरूजी तरुण मंडळाचा गणराय शिवक्रांती रथावर विराजमान असून या बाप्पाचीही मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुक सुरू आहे. त्यात रथावरील महापुरूषांच्या प्रतिमेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही प्रतिमा देखाव्यात लावण्यात आली आहे.
सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी होत विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला आणि सर्व गणेश भक्तांना विसर्जन काळात पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली होती. त्यात सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. तरीसुद्धा दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणेकर आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या थाटात निरोप देत आहेत. विशेष म्हणजे, यंदा पुण्यातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत केवळ दोन ढोल-ताशा पथकांची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ढोल-ताशा पथकांमध्ये टोल वाजविण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदुषणाच्या बाबतीत निर्बंध घालण्याचा पुरेपूर प्रयत्न पुण्यात करण्यात येत आहे. प्रत्येक मंडळाला केवळ दोन ढोल-ताशा पथकांची परवानगी देण्यात आल्यामुळे गर्दी आणि ध्वनी प्रदुषणावरही नियंत्रण राखता येणार आहे.