पिंपरी-चिंचवडमधील कचरावेचक महिलेच्या मुलीने दहावीत उत्तीर्ण होत ७७ टक्के गुण मिळवले आहेत. नेहा लालबहादूर जैस्वाल अस गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या वडिलांचं गंभीर आजाराने आठ वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आई शकुंतलादेवी यांनी घंटा गाडीवर काम करून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच काम सुरू केलं. नेहाला लहान भाऊ आणि बहीण असून तुटपुंजा पगारात संसार चालवण्याची तारेवरची कसरत आई शकुंतलादेवी करत आहेत.

नेहा लालबहादूर जैस्वाल हिने दहावीत ७७ टक्के गुण मिळवले असून यात तिच्या आईचा मोलाचा वाटा असल्याचं ती सांगते. सकाळी उठून आई घंटा गाडीवर जाऊन कचरा जमा करण्याच काम करते. आई गेल्यानंतर नेहा घरकाम आवरून शाळेत जाऊन अभ्यास करायची. अनेक वेळा पैशाअभावी नेहाला निरनिराळे अनुभव आले. दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेचे शुल्क न भरल्याने शिक्षकांनी तिला परीक्षेदरम्यान वर्गाच्या बाहेर काढले होते. तसेच आज वडील असते तर ही वेळ आपल्यावर आली नसती असं तिला त्यावेळी वाटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आई ने उसने पैसे घेऊन आपल्या मुलीचे शुल्क भरले होते. आईच्या कष्टाचे मोल ठेवत ती दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.

वडिलांना गंभीर आजार असल्याने त्यांचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून तिची आई घर चालवते. तसेच तिच्या लहान बहिणीचे आणि भावाचेही शिक्षण सध्या सुरू आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्चदेखील आईवर आहे असं नेहान सांगितलं. बहिण इयत्ता ७ वीत असून भाऊ इयत्ता ९ वीत शिक्षण घेत आहे. आपल्याला बँकेत मोठ्या पदावर नोकरी करायची आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली.