देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. तर सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एका अनोख्या उपक्रमाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यातील एस एम जोशी फाऊंडेशनच्या प्रांगणात आयोजित लोकशाही उत्सवा दरम्यान यंदा समलिंगी जोडप्याला झेंडा वंदन करण्याचा मान देण्यात आला होता. समलिंगी समीर समुद्र आणि अमित गोखले या जोडप्यांना झेंडा वंदन करण्याचा मान दिला.

समाजातील प्रत्येक घटकाला स्थान दिले जाते आणि आज प्रजासत्ताक दिनी असा सन्मान आम्हाला दिला आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे. या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव असल्याची भावना यावेळी समीर समुद्र आणि अमित गोखले यांनी व्यक्त केली.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता झाली. यात २२ राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते.