गणेशाच्या स्वागतासाठी राज्यभरात उत्साह, बाजारपेठा खरेदीसाठी फुलल्या

दुष्काळाचे विघ्न दूर केल्यामुळे यंदा वैभवशाली गणेशोत्सवाला लाभलेले मंगलमय वातावरण.. आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांची ‘होऊ दे खर्च’ ही मानसिकता.. देखावा पूर्ण करण्यासाठी झटत असतानाच मिरवणुका काढून मुहूर्तावर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यासाठी कार्यकर्त्यांची सुरू असलेली लगबग.. पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या आनंदयात्रेची सोमवारी (५ सप्टेंबर) प्रतिष्ठापना होत आहे. मानाच्या गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. ढोल-ताशा पथकांचा निनाद आणि ‘बाप्पा मोरया’चा गजर करणाऱ्या छोटेखानी मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून दुपारी साडेबारापूर्वीच सर्व मंडळांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होणार आहे.

मुंबई, पुण्यासह साऱ्या राज्याची रविवार सुट्टी गणरंगात न्हाऊन निघाली. सार्वजनिक मंडळांनी ढोल-ताशाच्या गजरात काढलेल्या मिरवणुका आणि गणेशमूर्ती घरी घेऊन जाण्याची सुरू असलेली नागरिकांची लगबग असे चित्र सर्वत्र दिसत होते.  बाजारपेठा फुले, मिठाया आणि आरास खरेदीसाठी गर्दीने फुलल्या होत्या.

लोकमान्य टिळक यांनी घरातील गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त करून दिले, त्याला यंदा सव्वाशे वर्ष होत आहेत. अग्रपूजेचा मान असलेल्या गणरायाच्या आगमनाची गणेश चतुर्थी ही तिथी आणि शिक्षक दिन असा अनोखा योग यंदाच्या वर्षी जुळून आला आहे. हे औचित्य साधून काही मंडळांनी ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापना पूजेचा मान शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना दिला आहे. एकीकडे मंडळाच्या देखाव्याचे काम पूर्ण करण्यासाठी गडबड सुरू असतानाच काही कार्यकर्ते ढोल-ताशा पथकांना त्याचप्रमाणे मधुर स्वरांनी रंग भरणाऱ्या बँडपथकांना मिरवणुकीच्या वेळेचे निरोप देण्यामध्ये व्यग्र होते. घरोघरी गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून रविवारच्या सुट्टीचा योग साधून गणरायासाठी मखर, विद्युत रोषणाईची सजावट करण्याची कामे पूर्ण करण्यात आली. एकीकडे हरतालिकेच्या व्रताचे पूजन करीत असताना महिलांनी सजावटीमध्ये योगदान दिले. नेहमीच्या मूर्तिकाराकडे यापूर्वीच नोंदणी केलेली गणेशमूर्ती सायंकाळी घरी आणण्याची लगबग सुरू होती. गणरायाच्या पूजेसाठी कमळ, केवडा, शमी, दुर्वा, पत्री यांसह पूजा साहित्य आणि नैवेद्यासाठी माव्याचे मोदक खरेदी करण्यासाठी तुळशीबाग आणि मंडई परिसर गजबजून गेला होता.

मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या सुमारास पेण ते वडखळदरम्यान तर दुपारच्या सुमारास कोलाड ते इंदापूर आणि माणगाव बाजारपेठ परिसरातील काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र वाहतुकीचे नियमन केल्याने ही वाहतूक कोंडी सुटली.

गणरायाच्या पूजेचा दुपारी दीडपर्यंत मुहूर्त

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला (५ सप्टेंबर) कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांची पूजा करून पहाटे साडेचारच्या ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत श्रींची प्रतिष्ठापना करावी. चतुर्थीच्या दिवशी सकाळी आठपर्यंत भद्रा करण आहे. मात्र, हा काळ प्रतिष्ठापनेसाठी वज्र्य नाही, असे ‘दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.

परंपरेनुसार कमळ, केवडा, शमी, दुर्वा आणि पत्री वाहून गणरायाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा, गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना पूजेसाठी सूर्योदयापासून म्हणजे सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते मध्यान्हकाळ म्हणजेच दुपारी दीड वाजेपर्यंतचा काळ हा मुहूर्त म्हणून चांगला आहे. मध्यान्हपिन्ही, चित्रा नक्षत्रयुक्त चतुर्थी उत्तम मुहूर्त असल्याने सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड हा प्राणप्रतिष्ठापना पूजेसाठी चांगला काळ असल्याचे शारदा ज्ञानपीठमचे पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.