आजोबा आणि आजीचा आत्मविश्वास तर आईच्या पाठिंब्यावर श्रुती चमरे या विद्यार्थिनीने शाळेतून पहिला क्रमांक पटकावत ९७ टक्के गुण मिळवले आहेत. आपल्या नातीने एवढे गुण मिळवल्यानंतर श्रुतीच्या आजी आजोबांनी तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच पुढे जाऊन ती मोठी गगन भरारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्याला भविष्यात जिल्हाधिकारी व्हायचे आहे, असा निश्चिय श्रुतीने केला आहे.

श्रुती चमरे हिचा संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. तिच्या शिक्षणात तिच्या आईचे म्हणजे सुमित्रा चमरे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यानंतर आजोबा हिरामण काची आणि आजी लता काची यांनी श्रुतीचा सांभाळ केला. त्यांनी शिक्षणात तिला काही कमी पडू दिलेले नाही. अवघड वाटणाऱ्या विषयांची तासिकादेखील लावली होती. आता जे काही करायचे आहे ते आईसाठी करायचे आहे असा निश्चय तिने केला आहे. भविष्यात तिला जिल्हाधिकारी व्हायचे असून जनतेची सेवा करायची आहे.

श्रुतीने दिवस-रात्र एक करत अभ्यास केला. दररोज सकाळी पहाटे पाच ते सात आणि रात्री नऊ ते बारा असा अभ्यास करून तिने दहावीत यश मिळवले आहे. तिला ९७.२० टक्के गुण मिळाले असून तिने शाळेत पहिले येण्याचा मानही मिळवला आहे. सर्व गोष्टींचे भान ठेवून भावनिक न होता यापुढे संघर्षाला तोंड द्यायचे तिने ठरवले आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असून मुलीदेखील मुलांपेक्षा कमी नाहीत हे दाखवून द्यायचे आहे, असे श्रुती म्हणाली. आई, आजोबा, आजी हे सर्व माझ्यासोबत असून खंबीर पाठिंबा असल्याचेही तिने सांगितले.