राज्यात एकीकडे करोना व्हायरस पुन्हा डोकं वर काढत असल्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यातही करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, पण नागरिक अजूनही गंभीर नसल्याचं ताजं उदाहरण समोर आलंय. पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून एका १८ वर्षांच्या तरुणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्याच अंगलट आला.

सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या एरंडवणे परिसरातील क्वारंटाईन सेंटरमधून एका १८ वर्षांच्या तरुणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मूळ दिल्लीच्या असलेल्या या तरुणीचा दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर निघण्याचा तिचा प्रयत्न होता, पण बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ही तरुणी खिडकीच्या गजांमध्ये अडकली. बराच प्रयत्न करुनही तिला बाहेर काढता येत नव्हतं, अखेर अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं आणि हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने ग्रील तोडून तिची सुटका करावी लागली.

सुदैवाने त्या तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली, पण जर दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उतरताना ही तरुणी जखमी झाली असती किंवा जीवावर बेतले असते तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता होती. दरम्यान, “यापूर्वीही तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी रात्री तिने पुन्हा दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ती खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले”, अशी माहिती डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.