पुण्यात गुटखा विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा हवाला होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार शहरातील पाच ठिकाणी छापे टाकले असता त्या कारवाईत ३ कोटी ५२ लाख ७४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल आणि ३ कोटी ४७ लाख ३७ हजार ९२० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरेश मूलचंद अग्रवाल आणि नवनाथ नामदेव काळभोर यांच्यासह ९ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील जुने साईबाबा मंदिराजवळ आरोपी सुरेश मूलचंद अग्रवाल यांचे एक दुकान आहे. गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू या मालाची स्टेट एक्सरसाईज ड्युटी चुकवून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तिथे छापा टाकला असता तेथील दुकानात ३ लाख ९२ हजार ५१२ रुपये किमतीचा मुद्देमाल, २ चार चाकी, १ दुचाकी आणि १ लाख ३१ हजार ३४० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्या कारवाईत सुरेश मूलचंद अग्रवाल या आरोपी सह चौघांना ताब्यात घेण्यात आले.

त्याच दरम्यान नवनाथ नामदेव काळभोर हा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय करणारा व्यक्ती देखील गुटखा विक्रीतून लाखो रुपयांचा हवाला करीत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पाच ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यामध्ये ३ कोटी ५२ लाख ७४ हजार ४९० रूपये किमतीचा मुद्देमाल आणि ३ कोटी ४७ लाख ३७ हजार ९२० रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याच बरोबर ९ मोबाईल, २ dvr आणि पैसे मोजण्याच्या २ मशीन असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.