स्थानिक कंपन्यांच्या कृत्रिम श्वसन उपकरणांद्वारे रुग्णांना श्वास

चिन्मय पाटणकर लोकसत्ता

पुणे : करोना काळात करोना बाधित रुग्णांना पुण्याने कृत्रिम श्वास मिळवून दिला आहे. पुण्यातील काही कंपन्यांनी विकसित केलेल्या कृत्रिम श्वसन उपकरणांमुळे स्थानिक रुग्णांची सोय झाली, तसेच शहर आणि राज्यासह देशभरातील काही शहरांमधून या उपकरणांना मागणी आली. त्यामुळे पुण्यामध्ये वैद्यकीय उपकरणांचे के ंद्र (हब) होण्याची क्षमता असून त्यासाठीची वातावरण निर्मिती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षी मार्चमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर पुण्यात वेगवेगळ्या स्तरावर संशोधन, प्रयोग सुरू झाले. त्यातून काही कंपन्यांना कृत्रिम श्वसन उपकरणे विकसित करण्यात यश आले.

रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत नोक्का रोबोटिक्स या कंपनीने तातडीची गरज म्हणून कृत्रिम श्वसन यंत्रणा विकसित करून, आवश्यक त्या मान्यता घेऊन उत्पादन सुरू केले. ‘गेल्या वर्षभरात एक हजारपेक्षा जास्त उपकरणांचे उत्पादन केले. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये दहापट मागणी वाढली. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी भरती के ली. पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रीस्पॉन्स (पीपीसीआर) या स्वयंसेवी समूहाने दोनशेपेक्षा जास्त उपकरणांची खरेदी केली. पुण्यासह चंदीगढ, हैदराबाद, कानपूर अशा विविध शहरांमध्ये उपकरणे गेली, असे नोक्का रोबोटिक्सचे निखिल कुरेले यांनी सांगितले.

महासाथ सुरू झाल्यावर कॅप्टन भरुचा यांच्या कृत्रिम श्वसन यंत्रणेचे प्रारूप विकसित करण्यास मदत केली. पण केवळ प्रारूप विकसित करून उपयोग नाही, तर काही भागांचे उत्पादन करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. त्यातून हाय फ्लो ऑक्सिजनचे (एचएफएनओ) उपकरण विकसित केले. देशभरातील ५० रुग्णालयांमध्ये हे उपकरण बसवण्यात आले. त्याशिवाय ऑक्सिजन प्लँट बसवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे, असे ‘अ‍ॅक्युरेट’ या कंपनीचे संचालक विक्रम साळुंके यांनी सांगितले.

नवजात बालकांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे उत्पादित करणाऱ्या ‘श्रीयश इलेक्ट्रो मेडिकल्स’ने परदेशी बनावटीच्या तोडीचे कृत्रिम श्वसन उपकरण विकसित केले आहे. त्याविषयी कंपनीचे संचालक सुधीर वाघमारे म्हणाले, की गेल्या वर्षभरात सुमारे चारशेहून अधिक उत्पादनांची निर्मिती केली. या उपकरणाला राज्यासह दिल्ली, हैद्राबाद, नेपाळ अशा विविध ठिकाणांहून मागणी आली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत या उपकरणाला जास्त मागणी आली.

‘डॉ. सतीश देवपुजारी यांच्या सहकार्याने कृत्रिम श्वसन प्रणाली विकसित के ली आहे. सध्या बाजारपेठेत उपलब्ध उपकरणांपेक्षा हे वेगळे उपकरण आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीने या उपकरणाचे डिझाईन के ले आहे. आता उत्पादन सुरू होणार आहे,’ असे के पीआयटीचे नवतंत्रज्ञान विभाग प्रमुख तेजस क्षेत्रिय यांनी सांगितले.