२५ लाख रुपयांपर्यंत निधी देण्यास महापालिका तयार

सार्वजनिक वारसा स्थळे पुनर्जीवित करण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जाते. परंतु त्याचा वापर प्रामुख्याने त्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठीच होतो. दीर्घकालीन उपाय म्हणून शहरातील वारसा स्थळांसाठी ‘हेरिटेज फाउंडेशन’ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मत आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले. अशी संस्था उभी राहिली आणि तिने ठोस आराखडा मांडला, तर पालिका वारसा स्थळांसाठी २५ लाख रुपयांपर्यंत निधी देऊ शकते, असेही ते म्हणाले.

‘जनवाणी’ व ‘इन्टॅक’ या संस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे हेरिटेज फेस्टिव्हल’चे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयुक्त बोलत होते. राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, मुंबई येथील वास्तुरचनाकार आभा लांबा, ‘जनवाणी’चे विश्वस्त अरुण फिरोदिया, विशाल जैन, ‘इन्टॅक’चे निमंत्रक श्रीकांत निवसरकर या वेळी उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीपर्यंत पालिकेच्या अर्थसंकल्पात पालिका वारसा स्थळे पुनर्जीवित करण्यासाठी ३ ते ४ कोटी रुपयांची तरतूद होती. या वर्षी ती वाढवून १८ कोटी करण्यात आली. शहरासाठीची ‘हेरिटेज फाउंडेशन’ स्थापन होऊन त्यांनी काही ठोस आराखडा सादर केल्यास पालिका २५ कोटी रुपयांपर्यंतचा निधी वारसा स्थळांसाठी या संस्थेला सुपूर्द करू शकेल. सार्वजनिक वारसा स्थळांबरोबरच खासगी वारसा स्थळांची जपणूक करण्यासाठीही प्रयत्न करता येतील.’’

शनिवारवाडा, विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वारसा स्थळांबरोबरच आजच्या पिढीस ज्यांचा अभिमान वाटू शकेल अशी नवी वारसा स्थळेही पुण्यात निर्माण करण्याची गरज असल्याचे नितीन करीर यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘नागरिक जिथे एकत्र येऊ शकतील अशी ठिकाणे तयार करायला हवीत. ही ठिकाणी चांगली दिसणारी व त्या शहराचे व्यक्तिमत्त्वही दाखवणारी असावीत. अशी ठिकाणे तयार करणे हे शहरातील ‘टाऊन प्लॅनिंग’मधील मोठे आव्हान आहे. ते पूर्ण करावे लागेल.’’

हेरिटेज वॉक’, सहली आणि कार्यशाळांची रेलचेल

‘पुणे हेरिटेज फेस्टिव्हल’मध्ये पुढील दहा दिवस शहरात ठिकठिकाणी ‘हेरिटेज वॉक’ आणि छोटय़ा सहलींची मौज घेता येणार आहे. तसेच काही कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. यातील काही कार्यक्रम सशुल्क, तर काही सर्वासाठी विनामूल्य आहेत. विनामूल्य कार्यक्रमांमध्ये आज सदाशिव पेठेतील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सकाळी ‘ब्राम्ही’ लिपीतील, तर दुपारी मोडी लिपीतील जुन्या कागदपत्रांविषयी माहिती घेता येईल, तर कोंढवा येथे ‘एनडीए’च्या वारशावर व्याख्यान ऐकण्याची संधी आहे. महोत्सवासंबंधीची अधिक माहिती www.puneheritagefestival.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.