पुणे शहर आणि परिसरात सोमवारप्रमाणेच मंगळवारी देखील उन्हाचा तडाखा कायम राहिला. शहरात सोमवारी ३९.४ अंश सेल्सियस एवढे तापमान होते. त्यात किंचित वाढ होऊन मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ३९.७ अंशांवर गेला.

शहरातील तापमान वाढण्यास मंगळवारी सकाळपासूनच सुरुवात झाली. दुपारी १२ ते ४ दरम्यान उकाडय़ाने पुणेकर चांगलेच हैराण झाले. सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीस्वारांना उन्हाचे चांगलेच चटके बसत होते.

अनेकजण सिग्नलच्या अलीकडे असलेल्या सावलीत दुचाकी थांबवत उन्हापासून बचाव करत होते. हे चित्र शहराच्या सर्वच भागात पाहावयास मिळाले.

दरम्यान, पुढील दोन दिवसात शहराच्या कमाल तापमानात वाढ होणार असून पारा चाळिशीच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.