पुण्यातील खराडी भागात झालेल्या होंडासिटीच्या धडकेत आजी आणि नातवाचा जीव गेला. याप्रकरणी पुणे महापालिकेचे अधिकारी शशिकांत जासुद यांचा मुलगा सौरभ जासूदला अटक करण्यात आली आहे. बेदरकारपणे होंडा सिटी कार चालवून सौरभने शांताबाई सोनावणे आणि नयन रमेश पोकळे या दोघांना धडक दिली. या धडकेत या आजी आणि नातवाचा मृत्यू झाला. होंडा सिटी कारने धडक दिल्यावर सौरभ तिथून पळाला होता. मात्र पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. खराडी भागातील रेडिसन हॉटेलसमोर बुधवारी रात्री हा अपघात झाला.

एमएच १२ एलडी १०११ ही होंडा सिटी कार कोणाचीही आहे याचा शोध जेव्हा पोलिसांनी घेतला तेव्हा ही कार पुणे महापालिकेचे अधिकारी शशिकांत जासूद यांची असल्याचं समोर आलं. शशिकांता जासूद हे वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात मालमत्ता कर विभागातले अधिकारी आहेत. त्यांच्या मुलाने अर्थात सौरभ जासूदने बेदरकारपणे गाडी चालवत तिघांना उडवलं होतं. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. संतप्त नागरिकांनी फरार कारचालकाला अटक करावे या मागणीसाठी खराडी ते मुंढवा मार्गावर रास्ता रोकोही केला होता. त्यानंतर सौरभ जासूदला अटक करण्यात आली.