पुण्यातील जुना बाजार चौकात शुक्रवारी लोखंडी होर्डिंग पडून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेत नाना पेठ भागात दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे रिक्षा चालक शिवाजी परदेशी यांचाही मृत्यू झाला. गुरुवारी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. आई आणि वडिलांचे छत्र दोन दिवसात हरवलेल्या समृद्धीशी संवाद साधला असता तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आता लहान भावाला म्हणजेच देवांशुला मोठं करायचं हेच ध्येय असल्याचं समृद्धीनं म्हटलं आहे.

बाबा कायम सांगायचे की देवांशुची काळजी घे आता आई आणि बाबा नसल्याने त्याची काळजी घेणार त्याला मोठं करणार हेच आपलं ध्येय आहे असं समृद्धी सांगते. त्याला चांगले शिक्षण देणार असून त्याला मोठे करणार आहे.तसेच आजी ची देखील काळजी घेणार असल्याच भावना तिने व्यक्त केली.

पुण्यातील जुना बाजार येथील मुख्य चौकात काल होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातामध्ये चार जणांपैकी रिक्षा चालक शिवाजी परदेशी यांचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली.शिवाजी परदेशी यांच्या पत्नीचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या अस्थी आळंदी येथे विसर्जित करून रिक्षामधून घरी येत होते.त्यावेळी त्यांच्या समावेत आई रुक्मिणी, मुलगी समृद्धी, मुलगा देवांशु आणि एक मित्र होता.शिवाजी हे जुना बाजार येथील सिग्नलला दीड वाजण्याच्या सुमारास थांबले असता.या चौकातील लोखंडी होर्डिंग कोसळण्याची घटना घडली. त्यामध्ये शिवाजी परदेशी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेची माहिती शिवाजी परदेशी हे राहत असलेल्या नाना पेठ परिसरात समाजातच हळहळ व्यक्त करण्यात आली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी यांची मुलगी समृद्धी यांच्याशी संवाद साधला असता.त्या म्हणाल्या की,आम्ही सर्व जण सकाळी आळंदी येथे आईच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी गेलो होतो.तेथून  दुपारी बाराच्या सुमारास निघालो आणि दीड वाजण्याच्या सुमारास आमची रिक्षा जुना बाजार येथील सिग्नल जवळ आली.तेव्हा काही समजण्याआधीच लोखंडी होर्डिंग आमच्या लाईनमध्ये असणाऱ्या सगळ्याच वाहनांवर कोसळला.त्यामध्ये मी,आजी आणि छोटा भाऊ आम्हा तिघांना थोडं लागलं .पण बाबा रिक्षा चालवत असल्याने त्यांच्या पुढच्या बाजूला लोखंडी भाग पडला.त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरानी काही वेळाने त्यांना मृत घोषित केले.हे सांगत असताना समृद्धी यांना अश्रू अनावर झाले.

अपघात एवढा भयानक होता की तो आठवला तरी धस्स होते.मात्र आता काहीच राहिलं नसून मी,आजी आणि चार वर्षांचा भाऊ एवढंच आम्ही राहिलो आहे.घरामध्ये मी मोठी असल्याने बाबा नेहमी सांगयाचे देवांशुची काळजी घे खरंच आता त्याची यापुढे काळजी घेत त्याला खूप मोठे करणार असल्याचे तिने सांगितले. समृद्धी 12 वी सायन्सचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात घेते आहे.
शिवाजी यांच्या आई रुक्मिणी परदेशी म्हणाल्या की, आम्ही आळंदी येथून निघाल्यावर दीडच्या सुमारास जुना बाजार येथे रिक्षा थांबली. काही समजण्या अगोदर लोखंडी होर्डिंग कोसळले. यात शिवाजी मृत्यू झाला.तो घरातील सर्व पाहत होता.तो नसल्याने सर्व संपल्यासारखे वाटत आहे.शिवाजीने सहा महिन्यापूर्वी कर्जकडून रिक्षा घेतली होती.घरात सर्व चांगले चालले होते.तर गुरुवारी शिवाजी च्या पत्नी चे निधन झाले तर काल शिवाजी चे निधन झाले.आता सगळं संपल्यासारखे वाटत असून आता समृद्धी आणि देवांशुसाठी करायचे आहे.त्या दोघांना मोठे करणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.