पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील ३३ उद्याने उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाने याबाबत आदेश काढले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील याला पुष्टी दिली आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असते. उद्यानातील लहान मुलांची खेळण्याची साधने अथवा ज्येष्ठ नागरिकांची व्यायामाची साधने लोखंडी असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच मास्क घालून व्यायाम करू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्यानात मास्क घालून व्यायाम करणे फायद्याचे ठरणार नाही. जर उद्यान सुरू झाल्यानंतर भेळ, पाणीपुरी इ. हातगाड्या बाहेर लागतील. त्यामुळे करोनासाठी लावण्यात आलेल्या यंत्रणेवर अधिक ताण पडेल. त्यामुळे उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या फिरण्यासाठी टेकडी, मैदाने खुली असून उद्यान सुरू करण्याचा निर्णय समाजाच्या हिताचा नाही. तसेच उद्याने भविष्यात सुरू करण्याचा निश्चित विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.