02 March 2021

News Flash

PIFF : ‘चुंबक’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार

‘गर्ल्स ऑफ दि सन’, 'अ ट्रान्सलेटर' आणि 'दिठी' या चित्रपटांनाही पुरस्कार

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा गुरुवारी कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात पार पडला. यावेळी ‘चुंबक’ या चित्रपटाने या वर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. तर ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला. या पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली. यंदाच्या महोत्सवात एकूण ५६ देशांतील १५० हून अधिक चित्रपटांचा आस्वाद पुण्यातील चित्रपट रसिकांनी घेतला.

पारितोषिक विजेते

 

रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

संदीप मोदी दिग्दर्शित ‘चुंबक’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कार पटकाविला. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही दिग्दर्शक व ५० टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते. सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठी या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा चित्रपट म्हणून पुरस्कार देत गौरविण्यात आले. या बरोबरच दरवर्षी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार यावर्षी सुमित्रा भावे (दिठी) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार स्वानंद किरकिरे (चुंबक) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देविका दफ्तरदार (नाळ) यांना, सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार सौरभ भावे व संदीप मोदी (चुंबक) यांना तर सर्वोत्कृष्ट छायालेखन पुरस्कार धनंजय कुलकर्णी (दिठी) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात इवा ह्युसन दिग्दर्शित ‘गर्ल्स ऑफ दि सन’ या चित्रपटाला ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरकार’ देत गौरविण्यात आले. रोख रु. १० लाख मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही दिग्दर्शक व ५० टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते. आंतरराष्टीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात ‘ अ ट्रान्सलेटर’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा चित्रपट म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर याच विभागातील ‘प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने ‘अ ट्रान्सलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक रॉड्रीगो बॅरिऊसो व सबॅस्टियन बॅरिऊसो या दिग्दर्शकांना गौरविण्यात आले. रोख रुपये ५ लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पारितोषिक विजेते

 

एफटीटीआयच्या शेवटच्या वर्षाला प्रथम आलेल्या संस्कृती चटोपाध्याय या विद्यार्थीनीला ‘पिफ स्पेशल पुरस्कार’ देत गौरविण्यात आले. या वर्षीपासून पुणे फिल्म फाउंडेशन आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट’ पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. यावर्षी ‘माय ओन गुड’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पिप्पो मेजापेसा यांना विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू सुनील राय यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 11:27 pm

Web Title: pune international film festival piff marathi movie chumbak won best movie award
Next Stories
1 अटकेत असलेला राष्ट्रवादीचा नगरसेवक दीपक मानकर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत
2 पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत केल्यास पोलिसांत तक्रार करणार : महापौर
3 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात बिबट्या जेरबंद
Just Now!
X