पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आयर्नमॅन म्हणून ओळखले जातात. रोखठोक आणि सडेतोड बोलणं हे त्यांचं वैशिष्ट्य. कोणत्याही दबावाखाली न येता अचूक निर्णय घेण्याची क्षमता असलेले पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं आज एकदमच वेगळं रूप अनेकांना पाहायला मिळालं. आयर्नमॅन कृष्ण प्रकाश हे आज हळवे झाल्याचं दिसून आलं. एका भावनिक मुद्द्यावरील कविता ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. एका तरुणीने वडील या विषयावर कविता सादर केल्यानंतर हा प्रकार घडला.

याबद्दल सविस्तर सांगायचं तर, पोलीस आयुक्त कार्यालयात ऋतुजा शांतीलाल पाटील नावाची तरुणी पोलीस आयुक्त यांना भेटायला आली होती. तिने वडिलांच्या निधनानंतर आयुष्यात आलेल्या अनुभवावर ‘झुळूक’ नावाचे पुस्तक लिहिले असून त्यातील ‘देवा घराचा बाबा’ ही कविता आज पोलीस आयुक्त यांना तिने ऐकवली. तेव्हा ‘आयर्नमॅन’ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. उपस्थित पोलीस अधिकारी देखील भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, कवितावाचन झाल्यानंतर ऋतुजाला पोलीस आयुक्त यांनी बक्षिस दिले. ऋतुजा लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर बाबांविना असलेलं आयुष्य हे ‘देवा घराचा बाबा’ या कवितेतून तिनं मांडलं आणि आपल्या भावनांना वाट करून दिली. या कवितेने पोलीस आयुक्तांचं मन जिंकलं.