01 October 2020

News Flash

भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच; काँग्रेसमध्येही घोळ

पुणे लोकसभा मतदारसंघावर बहुतेकवेळा काँग्रेसनेच वर्चस्व राखले आहे.

अविनाश कवठेकर, पुणे

पुणे हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता; पण गेल्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. विजयाची संधी असल्याने भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यापुढे पक्षांतर्गत आव्हाने आहेत. काँग्रेसमध्येही उमेदवारीचा घोळ सुरूच आहे.

पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यामुळे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यापुढे पुन्हा उमेदवारी मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पक्ष शिरोळे यांना पुन्हा संधी देणार का अन्य कोणाला संधी मिळणार, अशी चर्चा पक्षातच आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघावर बहुतेकवेळा काँग्रेसनेच वर्चस्व राखले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरोधात गेलेले जनमत आणि मोदी लाटेचा फायदा भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीत झाला.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. पाच वर्षांत शहरात अनेक विकासकामे केल्याचा दावा करीत खासदार अनिल शिरोळे यांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आहे. नदी सुधार योजनेला दिलेली गती, पुरंदर विमानतळ, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, घोरपडी येथील रेल्वे उड्डाणपूल, खासदार निधीतून शहर स्वच्छतेसंदर्भात केलेली कामे, चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाला मिळालेली मंजुरी ही खासदार शिरोळे यांची जमेची बाजू आहे. हिंजवडी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे जाण्यासाठी म्हाळुंगे-माण-हिंजवडी या पर्यायी रस्त्याचे कामही शिरोळे यांच्या कार्यकाळात मार्गी लागले. त्या आधारेच शिरोळे यांनी पुन्हा उमेदवारीचा दावा केला आहे.

भाजपने युवा नेत्यांना संधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आणि काँग्रेसकडून मराठा उमेदवार दिला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार जगदीश मुळीक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची नावेही उमेदवारीच्या चर्चेत अचानक पुढे आली आहेत. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा असली तरी, भाजप त्यांना उमेदवारी देईल, असे काकडे सांगत आहेत. निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची झालेली युती भाजपची जमेची बाजू ठरणार आहे.

भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने, बेरोजगारी, वाढती महागाई याविरोधात काँग्रेसकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली. जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. पक्षसंघटना मजबूत करण्यावर गेल्या पाच वर्षांत भर देण्यात आला. माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे या तिघांची नावे शहर काँग्रेसकडून निश्चित करण्यात आली. तसा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आला. या तिघांपैकी कोणा एकाला उमेदवारी मिळेल, असे वाटत असतानाच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे खासदार संजय काकडे यांना तिकिट देण्यास उत्सुक असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातून नाराजी व्यक्त करण्यात आली.

या जागेसाठी राष्ट्रवादीने आग्रह धरला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार हे पुण्यातून लढणार अशीही चर्चा होती. पण राष्ट्रवादीकडे कोणीही तगडा उमेदवार नाही. तसेच पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. भाजपशी सामना करण्याकरिता काँग्रेस प्रभावी उमेदवार कोण असेल याचा पक्षात आढावा घेतला जात आहे. उमेदवारीवरून वाद सुरू असतानाच ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून निष्ठावतांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

काकडे, गायकवाडही चर्चेत

शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. गायकवाड यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुचविल्याचे सांगितले जात आहे. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण खासदार संजय काकडे यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे निष्ठावंत की पक्षाबाहेरील उमेदवार याबाबत काँग्रेसमध्येच गोंधळाची परिस्थिती आहे.

पाच वर्षांत भाजपच्या खासदारांना भरीव काम करता आलेले नाही. त्यांचा जनसंपर्क नाही. शहर विकासासंदर्भात काहीही ठोस केलेले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही शहराचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. पाणीप्रश्नही सोडविता आले नाही. स्व-पक्षाच्याच विरोधात आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ त्यांच्यावर आली. योजना, प्रकल्प आणण्यात खासदारांना अपयश आले आहे.

– रमेश बागवे, शहराध्यक्ष

लोकसभा निवडणुकीपूर्वी मी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यानुसार पुण्यात मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटीमध्ये शहराचा झालेला समावेश, मुळा-मुठा जलवाहतूक प्रकल्पासाठी केलेले प्रयत्न या माझ्या जमेच्या बाजू आहेत. रखडलेली अनेक कामे आपल्या खासदारकीच्या काळात मार्गी लागली. पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा असली तरी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा मलाच संधी मिळेल.

– अनिल शिरोळे, खासदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2019 2:37 am

Web Title: pune lok sabha constituency bjp candidate in pune congress
Next Stories
1 Women’s Day 2019 : आयटी, मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रान्सजेंडर हृषिकाचा संघर्षमय प्रवास
2 मधुबन सोसायटी
3 आम्हीही वेगात! –  मोनिका उपाध्याय
Just Now!
X