News Flash

पाणीकराराचे गाडे अडले

राज्य सरकारकडून जास्तीचे पाणी मंजूर होईपर्यंत सध्याच्या कराराप्रमाणेच महापालिकेला पाणी मिळणार आहे

महापालिकेकडून आजपासून दुप्पट दराने पाणीपट्टी आकारणी

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात नव्याने करण्यात येणाऱ्या पाणीवाटप कराराची मुदत शनिवारी संपली. मात्र, पाणीकरार न झाल्याने रविवारपासून (१ सप्टेंबर) महापालिकेकडून दुप्पट दराने पाणीपट्टी आकरण्यात येणार आहे. तर, पाणीकरार करण्यासाठी शहराची लोकसंख्या, पाणीवापराची गरज लक्षात घेऊन त्यानुसार जलसंपदा विभागाने नव्याने आराखडा न केल्यानेच पाणीकरार होऊ शकला नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर नव्या पाणीकराराचे गाडे अडल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वाटपाबाबतचा करार १ मार्च २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१९ असा सहा वर्षांसाठी होता. या कराराची मुदत संपल्याने नवा करार करणे आवश्यक आहे. विद्यमान करार संपून नवा करार करताना महापालिकेची मागणी १७ टीएमसी पाण्याची आहे. त्यासाठी महापालिकेने शहराची लोकसंख्या ५२ लाख असल्याची माहिती जलसंपदा विभागाला दिली असून त्यानुसार प्रतिदिन १३३४.५० दशलक्ष लिटरप्रमाणे पाणी मिळावे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. मात्र, महापालिकेला वार्षिक ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याबाबतचा नवा करार करण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून जास्तीचे पाणी मंजूर होईपर्यंत सध्याच्या कराराप्रमाणेच महापालिकेला पाणी मिळणार आहे, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

‘कराराची मुदत संपल्यानंतर ९० दिवसांच्या आत करारनाम्याचे नूतनीकरण करावे लागते. त्यानुसार जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्रकुमार मोहिते यांनी पूर्वीच्या कराराला मुदतवाढ दिल्याने या कराराची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, महापालिकेकडून नव्या कराराबाबत हालचाली न झाल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी – एमडब्लूआरआरए) नियमाप्रमाणे करार नसल्याने दुप्पट पाणीपट्टी आकारली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

महापालिकेकडे जलसंपदा विभागाची तब्बल ८८.४४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरल्याशिवाय नवा करार होणार नाही, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

‘पाणी वाटपाचा नवा आराखडा हवा’

जुन्या करारातील निकष, नियम हे कालबाह्य़ झाल्याने एमडब्लूआरआरएने नवा पाणीकरार करताना पाणी वाटपाचा नवा आराखडा तयार करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. मात्र, त्यावर जलसंपदाकडून अद्यापही कार्यवाही झालेली नसल्याने नवा करार होऊ शकलेला नाही, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी शनिवारी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 3:41 am

Web Title: pune mahapalika water tariff at double rate akp 94
Next Stories
1 चाकण, पिंपरीतील लघुउद्योगांनाही झळा
2 पुण्यातील दोन मंडळांच्या गणेश मूर्तीची संभाजी भिडे गुरुजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना
3 मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना अटक
Just Now!
X