संघर्ष नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात यापूर्वीही भाजपने संघर्ष यात्रा काढली होती. त्या यात्रेचा मीही साक्षीदार आहे. त्यामुळे त्याबद्दल न बोललेलेच बरे, असे मुंडे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा काढली आहे. वातानुकूलित बसमधून सुरु झालेला प्रवास ते जेवणावळी अशा सर्व घटनांमुळे या संघर्ष यात्रेची जोरदार चर्चा राज्यात सुरु आहे. ही संघर्ष यात्रा पुण्यात पोहोचल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही संघर्ष यात्रा पंचतारांकित म्हणायची का, असा प्रश्न उपस्थित केला असता, धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यात यापूर्वीही भाजपच्या नेत्यांकडून संघर्ष यात्रा काढली होती. ती कशी आणि तिचे नियोजन कशाप्रकारे करण्यात आले होते, याचा मीही साक्षीदार आहे. त्यामुळे त्या संघर्ष यात्रेबद्दल न बोललेलेच बरे, असे सांगून त्यांनी भाजपवर टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्व नेते एकत्र आलो असून त्यांच्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार आहोत, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, अशोक चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याची टीका केली जात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना टोला लगावला आहे. संघर्ष असे नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही, असे ते म्हणाले आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपविरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल (से), समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन कवाडे, एमआयएम या सर्व विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा आयोजित केली आहे. पनवेलमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 4:51 pm