News Flash

पुणे : मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन

१९६५ च्या भारत - पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवले होते.

भारत – पाकिस्तान दरम्यान १९६५ मध्ये झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या, मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे १३ जुलै (सोमवार) रोजी, राहत्या घरी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.

‘पुण्याचे धन्वंतरी’ म्हणून प्रसिद्ध असणारे कै.डॉ.ह.वि.सरदेसाई यांचे ते धाकटे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, मुलगी पौलोमी व मुलगा वीर असा परिवार आहे.

मेजर जनरल पी.व्ही सरदेसाई यांनी १९६५ च्या भारत – पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवले होते. त्यांची तुकडी पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर जाऊन लाहोरचा दरवाजा ठोठावत होती. दरम्यान, त्यांना मिळालेला अत्यंत महत्वाचा संदेश अन्य रणगाड्यांपर्यंत पोहचवणे अत्यावश्यक होते. दूरसंचार संचाचा संपर्कही तुटला होता. अखेर हा संदेश पोहचवण्यासाठी ते जीवाची तमा न बाळगता स्वतः रणगाडयाखाली उतरले व सातत्याने सुरू असलेल्या बॉम्ब वर्षावातून मार्ग काढत त्यांनी इतरापर्यंत तो संदेश पोहचवला.

यानंतर पुन्हा ते आपल्या रणगाड्याकडे येत असताना, त्यांच्याजवळच बॉम्ब फुटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बॉम्बचे तुकडे त्यांच्या पाठीच्या कण्यात घुसले होते. नंतर जर शस्त्रक्रिया करून ते काढण्यात आले असते, तर त्यांना कायमचा अर्धांगवायू होण्याच धोका होता. परिणामी संपूर्ण कारकीर्द ते या वेदना सहन करत देशसेवेत कायम राहिले व मेजर जनरलच्या पदापर्यंत त्यांची पदोन्नती झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 12:58 pm

Web Title: pune major general p v sardesai passed away msr 87
Next Stories
1 पुण्यात लॉकडाउनच्या एक दिवसआधीच चोरट्यांनी साधला डाव, लंपास केली पावणे तीन लाखाची दारू
2 टाळेबंदीचा घरांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम
3 धरणात गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पाणीसाठा
Just Now!
X