पुणे : प्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून केल्याची घटना नऱ्हे भागातील मानाजीनगरमध्ये घडली. आरोपीने मोबाइलवर संदेश पाठवून नातलगांना याची माहिती दिल्यानंतर गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

कोमल राहुल हंडाळ (वय २२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती पती राहुल राजेश हंडाळ (वय २३, रा. अंकुश पॅलेस, कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि राहुल यांचा प्रेमविवाह झाला होता. कोमल एका खासगी रुग्णालयात साफसफाईचे काम करीत होती. राहुल काही कामधंदा करीत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. मोबाइल चोरीचे काही गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांत भांडण झाले होते. त्यामुळे कोमल माहेरी कर्वेनगरला गेली होती. मात्र, भांडण करणार नसल्याचे सांगून राहुलने तिला परत आणले होते.

गुरुवारी पहाटे दोघांत पुन्हा भांडणे झाली. त्यात राहुलने तिला बेदम मारहाण केली. दोरीच्या साहाय्याने तिला छताच्या पंख्याला लटकवून फाशी दिली. त्यानंतर तो घराबाहेर पडला आणि कोमलच्या नातलगांना त्याने या प्रकाराबाबत मोबाइलवर संदेश पाठविला. त्यामुळे तिच्या नातलगांनी थेट पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी आले असता, छताच्या पंख्याला दोरी लटकलेली दिसली.

कोमलला खाली झोपविण्यात आले होते. तिच्या अंगावर नवी साडी गुंडाळण्यात आली होती. त्याचप्रमाणे तिला लिपस्टिक लावून मंगळसूत्रही घालण्यात आले होते. पोलिसांची घटनास्थळाची पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केला. काही वेळातच त्याचा ताब्यात घेण्यात आले.

धनकवडीतही पत्नीचा खून

मुलांना घरी येण्यास उशीर झाल्याने त्यांना घरात घ्यायचे नाही, असे सांगूनही मुलांना घरात घेतल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री धनकवडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सुधा रवी केसरी (४५, रा. धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रवी नंदलाल केसरी (वय ५५) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.