वयोवृद्ध आई वडिलांच्या सततच्या आजारपणामुळे आणि प्रत्येकवेळी लग्नासाठी नकार मिळाल्याने पुण्यातला एक तरूण नैराश्यात गेला. याच नैराश्यातून या तरूणाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छा मरणाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून या तरूणाला नैराश्यातून बाहेर काढा असे आदेश पुणे पोलिसांना देण्यात आले. या तरूणाचे मन वळवण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

पुण्यातल्या दत्तवाडी भागात रहाणाऱ्या तरूणाने नैराश्यातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित इच्छा मरणाची मागणी केली. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने पुणे आयुक्तांना याबाबत कळवले. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी या तरूणाशी संपर्क केला आणि त्याचे समुपदेशन केले.

नेमके काय लिहिले पत्र?

मी माझ्या नाकर्तेपणामुळे आनंदाने इच्छा मरणाची मागणी करतो आहे. मी आनंदाने मृत्यूला सामोरा जाण्यास तयार आहे. मी ३७ वर्षांचा अविवाहित तरूण आहे. मी नोकरी करत असून माझे मासिक उत्पन्न २५ हजार रूपये आहे. माझी आई ७३ वर्षांची आहे आणि वडील ८१ वर्षांचे आहेत. माझी घरची परिस्थिती साधारण आहे. मला माझं स्वतःचं अस्तित्त्व बनवायचं आहे मात्र जगाने मला हे करण्यासाठी अपात्र ठरवले आहे. माझ्यामुळे कुणीही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही. अगदी माझे आई वडीलही नाही. आई वडिलांची सेवा करणारी जोडीदारही मिळत नाही.

हा मजकूर असलेलं पत्र मुख्यमंत्री कार्यालयात पोहचलं तेव्हा या पत्राची तातडीने दखल घेण्यात आली. पोलिसांनी या तरूणाला गाठलं आणि त्याचं समुपदेशन केलं.