मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात महाजनादेश यात्रेच्या माध्यमातुन नागरिकांशी संवाद साधत आहेत. महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात जाणार आहे. ही यात्रा डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जाणार आहे. यानिमित्ताने मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात लक्षवेधी आंदोलन करत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी ही माहिती दिली आहे.

“अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच राज्यातील गड आणि किल्ल्यांवर पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर मागील तीन वर्षांच्या काळात मराठा समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्याबाबतची पूर्तता अद्याप देखील झाली नाही. यामुळे कार्यकर्त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासह अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत. त्या मागण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डेक्कन येथील संभाजी महाराजाच्या पुतळ्यास अभिवादन करून सरकार विरुद्ध लक्षवेधी आंदोलन केले जाणार आहे,” अशी माहिती शांताराम कुंजीर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. अन्यथा भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला आहे.