18 November 2017

News Flash

पुस्तक पेटी योजनेतून बाळगोपाळांची पुस्तकांशी मैत्री

लहान वयामध्येच मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी हा उद्देश यानिमित्ताने साध्य झाला आहे.

 प्रतिनिधी, पुणे | Updated: July 16, 2017 4:33 AM

लहान वयामध्येच मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी हा उद्देश यानिमित्ताने साध्य झाला आहे.

बालवयामध्येच मुलांवर वाचनाचे संस्कार घडावेत आणि त्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशातून पुस्तक पेटी योजना हा अभिनव उपक्रम पुणे मराठी ग्रंथालयाच्या बालविभागातर्फे राबविला जात आहे. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ हा समर्थाचा उपदेश आचरणात आणून विविध शाळांमध्ये पुस्तक पेटी योजनेद्वारे बाळगोपाळांची पुस्तकांशी मैत्री जुळली आहे.

पुणे मराठी ग्रंथालयाच्या बालविभागांतर्गत गेल्या वर्षांपासून काही शाळांमध्ये पुस्तक पेटी योजना हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रंथालयाचे सहकार्यवाहक सुधीर इनामदार आणि कार्यवाहक डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्या. रानडे बालक मंदिर शाळेमध्ये गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील लहान गट आणि मोठय़ा गटातील विद्यार्थ्यांना पुस्तके वाचून दाखविली जातात. छोटी छोटी वाक्ये आणि चित्रे असलेली पुस्तके हाताळण्यास दिली जातात. लहान वयामध्येच मुलांची पुस्तकांशी मैत्री व्हावी हा उद्देश यानिमित्ताने साध्य झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन मराठी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेटी योजना सुरू करण्यात आली आहे. ग्रंथालयाने कर्वेनगर येथील ज्ञानदा प्रशालेतील सहावी आणि सातवी इयत्तेमधील विद्यार्थी दत्तक घेतले असून त्या विद्यार्थ्यांनाही पुस्तक पेटी योजनेचा लाभ मिळत आहे.

ग्रंथालयामध्ये असलेल्या पु. ल. देशपांडे मुक्तांगण या बालविभागातील साधारण तीनशे पुस्तके ही पुस्तक पेटी योजनेअंतर्गत शाळांमध्ये वाचनासाठी नेली जातात. शाळांमध्ये दर आठवडय़ातून निश्चित करण्यात आलेल्या दिवशी मुलांना मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचनासाठी दिली जातात. ‘बोक्या सातबंडे’, ‘चांदोबा’, ‘चंपक’, ‘वयम्’ अशा मासिकांपासून ते ‘हॅरी पॉटर’पर्यंत विषयांचे वैविध्य असलेली पुस्तके या पेटीमध्ये असतात. माधुरी पुरंदरे आणि अच्युत गोडबोले यांची पुस्तके मुले आवर्जून वाचतात. त्यांच्या पुस्तकांना सातत्याने मागणी असते. पुस्तक पेटीतील पुस्तकांच्या वाचनातून मुलांचे मनोरंजन तर होतेच. पण, त्याबरोबरच वाचनामध्ये गती, अक्षरांची ओळख, एकाग्रता या गुणांचा सहजगत्या विकास घडत असल्याचे दिसून आले आहे. पाठय़पुस्तकासह अवांतर वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण झाली असून त्यांचे लेखन कौशल्यही सुधारले आहे, असे निरीक्षण विविध शाळांतील शिक्षक आणि पालकांनी नोंदविले असल्याची माहिती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल संजीवनी अत्रे यांनी दिली. पुस्तक पेटी योजना उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. मुले शाळेत पुस्तकांची पेटी येण्याची वाट पहात असतात. आमचे सहकारी मुलांना पुस्तके वाचून दाखविण्याबरोबरच गोष्टी सांगतात आणि घरचा अभ्यासही देतात, असे अत्रे यांनी सांगितले.

वाचनाची ‘अभिरुची’ वाढतेय

पुणे मराठी ग्रंथालयाचा ‘पुस्तक पेटी’ हा उपक्रम शहरातील विविध शाळांबरोबरच वंचित विकास संस्थेच्या ‘अभिरूची’ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वर्गामध्ये राबविण्यात येत आहे. जनता वसाहत आणि अप्पर इंदिरानगर या दोन वस्त्यामध्ये असलेल्या वर्गामध्ये पुस्तके आणि गोष्टीवाचन असे कार्यक्रम या वर्गामध्ये सुरू असतात.

First Published on July 16, 2017 4:33 am

Web Title: pune marathi granthalaya implemented book bank scheme for kids