संभाजी उद्यानातून हटवण्यात आलेला राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा उभारु अशी घोषणा पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी केली आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला. पहाटे समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमागे संभाजी ब्रिगेडचा हात असल्याची चर्चा आहे. या घटनेवर नाराजी व्यक्त होत असतानाच पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कठोर पोलीस कारवाई व्हावी. मतांचे राजकारण करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीदेखील या घटनेचा निषेध दर्शवला आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणे निंदनीय असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. विनायक मेटे यांनीही या घटनेचा निषेध दर्शवला. राम गणेश गडकरी यांचे योगदान मोठे आहे. अशा पद्धतीने पुतळ्याची नासधूस करणे राज्याच्या संस्कृतीला साजेसी नाही असे त्यांनी सांगितले. राम गणेश गडकरी यांच्या लिखाणातून संभाजी महाराज यांचा अवमान झाला की नाही हा वेगळा विषय आहे. पण नाटकांच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे मेटे यांनी सांगितले. मराठा समाज सर्व समाजाचे पालकत्व घेणारा समाज आहे. त्यामुळे शिवाजी किंवा संभाजी महाराजांच्या नावाने असे करणे हे त्यांना लहान केल्यासारखे आहे याकडेही मेटेंनी लक्ष वेधले. राम गणेश गडकरी यांचे लेखन आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याचा प्रतिवाद व्याख्यान, लेखन, विचाराच्या मार्गाने करा, पुतळे फोडून नाही असे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.  काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुण्यातील घटनेचे समर्थन केले आहे. संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा हात नाही. पण ज्या मर्द मराठ्यांनी हे केले त्यांना सलाम अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.