न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात ३० विद्यार्थिनींचा प्रवेश

‘तब्बल ८१ वर्षांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींनी शिक्षण घेण्याच्या या ऐतिहासिक घटनेच्या तुम्ही साऱ्या जणी घटक आहात,  झाशीची राणी लक्ष्मीबाईप्रमाणे पराक्रमी व्हा,’ अशा प्रेरक आवाहनासह महापौरबाईंनी घेतलेला पहिला तास रंगला!

निमित्त होते तब्बल ८१ वर्षांच्या खंडानंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पुन्हा सुरू झालेल्या सहशिक्षणाचे! नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या स्वागताचा पहिला तास महापौर आणि शाळेचे संस्थापक लोकमान्य टिळक यांच्या पणत-सूनबाई मुक्ता टिळक यांनी घेतला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १९३६ पर्यंत मुलींना प्रवेश दिल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतर ८१ वर्षे या शाळेत केवळ मुलांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र, या शैक्षणिक वर्षांपासून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षण सुरू करण्याचा निर्णय डेक्कन एज्युकेशन सोसायटीने घेतला. यंदा पाचवीच्या वर्गात ३० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे.

महापौरांनी विद्यार्थिनींसह बाकावर बसून त्यांच्याशी संवाद साधला. ‘लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ जोशी यांनी १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना नाना वाडय़ात केली. त्या वेळी वर्गात बेंच नव्हते. जमीन खडबडीत होती. शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकमान्य टिळकांनी खड्डे बुजवून स्वत शेणाने जमीन सारवली. या सर्व समाजधुरिणांनी घेतलेले अपार कष्ट आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज शैक्षणिक वैभव पाहात आहोत,’ असे टिळक यांनी विद्यार्थिनींना सांगितले.