रस्ते पुनर्रचनेचे आता काय होणार?

शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अधिकाधिक मोकळे असावेत, पादचारी आणि वाहनचालकांना त्यांचा चांगला फायदा व्हावा, रस्त्यांचे रूंदीकरण व्हावे, अशी स्पष्ट भूमिका घेत महापौर मुक्ता टिळक यांनी रस्ते अरूंद करण्याच्या योजनेला विरोध दर्शविला आहे. दरम्यान, वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रमुख दहा रस्त्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्रचनेच्या नावाखाली रस्ते अरूंद करण्याच्या निर्णयाबाबत आता काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती भागात असलेल्या रस्त्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याअंतर्गत लक्ष्मी रस्ता, कुमठेकर, टिळक, बाजीराव रस्ता, फग्र्युसन, केळकर, शिवाजी रस्त्यांची पुनर्रचना होणार आहे. एकूण १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पुनर्रचना होणार आहे. या रस्त्यावरील पदपथांची नव्याने निर्मिती केली जाणार असून रस्त्याच्या आवश्यकतेप्रमाणे सायकल मार्गही प्रस्तावित करण्यात आले आहेत. पदपथ वाढविण्यात येणार असल्यामुळे आणि त्यावर सुशोभीकरणाचा मुलामा लावण्यात येणार असल्यामुळे हे सर्व रस्ते वाहतुकीसाठी अरूंद होणार असून सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडणार आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी ही भूमिका घेतली आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आवश्यक आहेत. त्यावर विचारही सुरु आहे. रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने मोकळे असावेत, पादचाऱ्यांना विनाअडथळा त्यावरून चालता यावे, अशीच भूमिका आहे. रस्ता रूंदीकरण करणे हाच त्यावरील उपाय आहे. रस्ते अरूंद करून वाहतूक कोंडी सुटणार नाही, तर त्यामध्ये आणखीच भर पडेल. त्यामुळे प्रमुख रस्त्यांची पुनर्रचना होत असली तरी ते अरूंद करण्यास विरोधच राहील, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

दरम्यान, प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठीच अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही रचना करण्यात येणार आहे. रस्त्यांची पुनर्रचना होत असताना ते अरूंद होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यानुसारच रस्त्यांचे आराखडे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने पदपथांची रूंदी वाढविण्यात येईल. मात्र रस्ते वाहतुकीसाठी अरूंद होणार नाहीत, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, लक्ष्मी रस्त्यासह मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांची पुनर्रचना होणार असली तरी तेथील पदपथांची रुंदी काही प्रमाणात वाढविली जाईल. त्याची काही प्रमाणात आवश्यकताही आहे. पण पूर्ण रस्ते अरूंद करण्यास मात्र विरोधच राहील, असे महापौर टिळक यांनी सांगितले.