सदाशिव, नारायण, शनिवार पेठेतील कोंडी सोडवण्यासाठी व्यावसायिकांशी चर्चा

लक्ष्मी रस्त्यालगत असलेल्या सदाशिव पेठ, नारायण आणि शनिवार पेठेतील अरूंद रस्त्यांवर विशेषत: छोटय़ा गल्ल्यांमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांत औषध विक्री, छपाई, कपडे विक्री आदी व्यवसाय मोठय़ा संख्येने वाढले आहेत. एके काळी शांत असलेल्या या गल्ल्यांचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. या भागात मालवाहू गाडय़ा, मोटारी, दुचाकी अस्ताव्यस्त पद्धतीने लावण्यात आल्याने सकाळी आणि सायंकाळी मोठी कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी विश्रामबाग वाहतूक विभाग आणि महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. या भागातील व्यावसायिकांशी त्यांनी चर्चा केली असून वाहतुकीच्या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

सदाशिव पेठेतील गाडगीळ रस्ता, पेरूगेट, नागनाथ पार, हत्ती गणपती चौक परिसरात गेल्या काही वर्षांत अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. सदाशिव पेठेतील नागनाथ पारालगतच्या छोटय़ा गल्ल्या हा भाग तर ‘मेडिकल गल्ली’ म्हणून प्रसिद्ध पावला आहे. या भागात अनेक घाऊक औषध विक्रेत्यांनी त्यांची दुकाने सुरू केली. त्यामुळे एके काळी दुपारी एकनंतर शुकशुकाट असणाऱ्या गल्ल्यांमध्ये वाहनांची गर्दी वाढली आहे. या परिसरात अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ या परिसरात असते. अनेक विद्यार्थी या भागात भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहत आहेत. त्यामुळे या भागात हॉटेल व्यवसाय गेल्या काही वर्षांत वाढीस लागला.

नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकापासून लोखंडे तालमीपर्यंतच्या गल्लीत मोठय़ा संख्येने कपडे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. याबरोबरच शनिवार पेठेतील मेहुणपुरा भाग तर आता ‘पेपर गल्ली’ म्हणून ओळखला जात आहे. सदाशिव, नारायण, शनिवार पेठेतील अरूंद गल्ल्यांमध्ये होणाऱ्या कोंडीमुळे तेथील स्थानिक रहिवासी मोठय़ा प्रमाणावर वैतागले आहेत. त्यांनी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. या भागाचा समावेश महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रभागात होतो. टिळक यांच्याकडेही रहिवाशांनी तक्रारी केल्या.

या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांचा विश्रामबाग विभाग आणि महापौर मुक्ता टिळक यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली. तेथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली.

सदाशिव, नारायण, शनिवार पेठेतील अरूंद रस्त्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर कोंडी होते. या भागात मोठय़ा संख्येने मालवाहू टेम्पो, ट्रक थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.

अरूंद गल्ल्यांमध्ये अनेक सोसायटय़ा आहेत. सोसायटीतील रहिवासी त्यांच्या मोटारी रस्त्यावर लावतात तसेच या भागात खरेदीसाठी येणारे अनेक जण रस्त्याच्या दुतर्फा सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावतात. या भागातील कोंडी सोडविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक आणि वाहतूक पोलिसांकडून नुकतीच या भागाची पाहणी करण्यात आली. व्यापारी आणि रहिवाशांशी या वेळी चर्चा करण्यात आली, अशी माहिती विश्रामबाग वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सूरज पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या भागातील व्यावसायिकांशी महापौर टिळक आणि पोलिसांनी चर्चा केली. मालवाहू वाहने गर्दीची वेळ टाळून आल्यास कोंडी कमी होईल तसेच रहिवाशांनी सम-विषम दिनांक पाहून वाहने लावल्यास वाहतुकीला अडथळा होणार नाही. टिळक यांनी वाहतूक पोलिसांना वाहतूक चिन्हांचे दोनशे फलक देण्याचे मान्य केले आहे तसेच रस्त्यावर पट्टे आखण्याचे काम वॉर्डस्तरीय निधीतून करण्यात येणार आहे, असे सहायक निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

अरूंद गल्लीत होणाऱ्या कोंडीमागची कारणे

* अरूंद गल्ल्यांमध्ये येणारी मालवाहू वाहने

* सम-विषम दिनांक न पाहता लावण्यात येणारी वाहने

* वाहतुकीच्या नियमांचे फलक अनेक भागांत नाहीत

* फलक नसल्याने पोलिसांच्या कारवाईवर मर्यादा, अनेकदा वादाचे प्रसंग

* अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची वाहने

* बेकायदा फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे कोंडी

* काही व्यापाऱ्यांची अरेरावी