स्थानिक संस्था कराला (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) पुणे व्यापारी महासंघाचा विरोध कायम असून सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, ही महासंघाची मागणी देखील कायम आहे. मात्र, एलबीटी अद्यापही रद्द झालेला नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन न करता पुढील कारवाई टाळण्यासाठी एलबीटीचा रीतसर भरणा करावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.
एलबीटीबाबत पुनर्विचार करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू असल्यामुळे एलबीटी भरू नये, अशी चर्चा व्यापारी वर्गात सुरू झाली असली, तरी एलबीटी अद्याप रद्द झालेला नाही, या वस्तुस्थितीकडे व्यापारी महासंघाने लक्ष वेधले आहे. महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी तसे प्रसिद्धीपत्रक सोमवारी दिले. एलबीटी न भरण्यासंबंधी सध्या चर्चा सुरू असून या बाबत महासंघाची बैठक झाली. एलबीटीसंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन व्यापाऱ्यांनी करू नये, तसेच पुढील कारवाई टाळण्यासाठी रीतसर एलबीटी भरावा, असे आवाहन या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सरकारविरोधी मतदान
महासंघाचा एलबीटीचा विरोध कायम आहे. एलबीटीच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात आंदोलनही करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीतही कोणतीही बोटचेपी भूमिका न घेता उघडपणे सरकारविरोधात मतदान करा, असा आदेश महासंघाने व्यापाऱ्यांना दिला होता आणि त्यातून व्यापाऱ्यांच्या असंतोषाला वाट करून दिली होती. त्यानुसार व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या विरोधात मतदान केले. सरकारने एलबीटी रद्द केला नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीतही सरकारविरोधी मतदानाची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा पितळीया यांनी दिला आहे.
या पुढील काळात व्यापाऱ्यांना गृहीत न धरता व्यापार-उदीम वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन महासंघाचे खजिनदार फत्तेचंद रांका यांनी केले आहे.