News Flash

पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न अखेर पूर्ण; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली ट्रायल रन

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर शुक्रवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली

Pune Metro, Ajit Pawar, Metro Train, Metro Trial Run, Vanaj to Ideal Colony
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर शुक्रवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांची कामं समांतर पद्धतीने करण्यात येत आहेत. याआधी वनाज ते रामवाडी या भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आता वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली. या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महा मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून याची माहिती दिली होती. पुणे मेट्रोच्या या टप्प्याची चाचणी शुक्रवारी सकाळी ७ वाजता केली जाणार असून त्यावर “संकल्पातून सिद्धीकडे; पुणे मेट्रोची उद्या ट्रायल!” असं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं होतं.

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गिके ची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. एकूण पाच किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे. या मार्गावर मेट्रोने सरावपूर्व चाचणी घेतली होती. ही मार्गिका उन्नत असून रूळ टाकण्यासह विद्युत तारांची कामे पूर्ण झाली असून मार्गिके अंतर्गत काही मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण झालेली आहेत.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट अखेपर्यंत वनाज ते रामवाडी या मार्गिकेचा काही भाग सुरू करण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा आग्रह आहे. टाळेबंदी असतानाही महामेट्रोने या मार्गावरील कामे वेगाने सुरू ठेवली होती. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके वर मेट्रो धावण्याची चाचणी घेण्यासही प्राधान्य देण्यात आले होते. यापूर्वी पिंपरी चिंचवडमधे महामेट्रोने मेट्रोची यशस्वी चाचणी घेतली होती. ही चाचणी घेतल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही टप्प्यातील मेट्रो मार्ग प्रवासी सेवेसाठी सुरू करण्याचे विचाराधीन आहे.

Photos : पुणे मेट्रोची पहिली झलक पाहिलीत का?

कोथरूड येथील कचरा भूमीच्या जागेत महामेट्रोने पार्किंग आणि देखभाल दुरुस्तीसाठी कार शेड उभारले जात आहे. त्याला हिल व्ह्य़ू पार्क कार शेड असे नाव देण्यात आले आहे. त्याचे कामही महामेट्रोकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी मेट्रोच्या तीन डबे असलेल्या दोन मेट्रो रेल्वे ठेवण्यात आल्या आहेत. या दोन मेट्रोच्या साहाय्याने ही चाचणी घेतली गेली. मेट्रोचे डबे इटलीतील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत. विशिष्ट धातूपासून हे डबे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३२ किलोमीटर एवढी आहे. यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत आणि तेथून पुढे स्वारगेट पर्यंत भूमिगत आहे. भूमिगत मेट्रो मार्गिके चे कामही वेगात सुरू आहे. भूमिगत मेट्रो मार्गिके साठी बोगदा निर्मितीचे काम कृषी महाविद्यालयापासून कसबा पेठेपर्यंत पोहोचले आहे. स्वारगटेपासून कसबा पेठेपर्यंतचे कामही सुरू झाले आहे. नदीपात्राखालूनही महामेट्रोने भूमिगत मार्गिके साठी बोगदा निर्मिती करण्याचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण के ला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 7:45 am

Web Title: pune metro ajit pawar metro trial run from vanaj to ideal colony svk 88 sgy 87
Next Stories
1 मी जेमतेम ६० टक्क्य़ांनी उत्तीर्ण!
2 आज मेट्रोची चाचणी
3 पावसाळ्यात डांबरीकरण
Just Now!
X