केंद्रीय नगरविकास विभागाकडून प्रस्ताव मंजूर

पुणे मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड – पीआयबी) मान्यतेनंतर केंद्रीय नगरविकास विभागानेही पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रस्तावाचा पुढील प्रवास गतीने होण्याची आणि महापालिका निवडणुकीपूर्वीच मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रीय नगरविकास विभागाने पुणे मेट्रोला मान्यता दिल्यामुळे हा प्रस्ताव पुढच्या टप्प्यात अर्थ मंत्रालयाकडे जाणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळापुढे तो अंतिम मान्यतेसाठी ठेवला जाईल. मेट्रोच्या प्रस्तावाला पीआयबीने १४ ऑक्टोबर रोजी मान्यता दिली होती. त्या वेळी झालेल्या सादरीकरणादरम्यान मेट्रोचा प्रस्तावित मार्ग, मेट्रोचा आर्थिक आराखडा यांचे सादरीकरण करण्यात आले होते. प्री-पीआयबीच्या बैठकी दरम्यान उपस्थित झालेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यामुळे त्या बैठकीत मेट्रोला मान्यता मिळाली होती.

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्या वेळी पुणे मेट्रोला नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याची माहिती नायडू यांनी शिरोळे यांनी दिली. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याचे शिरोळे यांनी शुक्रवारी सांगितले. मेट्रो प्रकल्पाला पीआयबीची मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर अखेपर्यंत मेट्रोचे भूमिपूजन करण्याची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या मान्यतेला औपचारिकताच उरली असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मेट्रोचे भूमिपूजन होईल, असे सांगण्यात आले.