पुणे-  पुणे, मुंबई आणि नागपुर या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम सुरु असून या तिन्ही प्रकल्पांसाठी राज्य सरकारने अंदाजपत्रकात एकत्रितपणे ७१० कोटी रुपयांची तरतुद केली आहे. या विषयी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, पुणे शहराच्या मेट्रो करिता राज्यसरकार ने केलेल्या तरतुदी मुळे मेट्रोच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर लवकरच पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या कामाची निविदा या महिना अखेरीस खुली होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर यावर पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, पुणे मेट्रोसाठी केवळ १३० कोटीची तरतूद केल्याचे स्पष्ट होत आहे.

यामधून केंद्र आणि राज्य सरकारने फसवणूक केल्याचा आरोप केला असून ही ७१० कोटी रुपयांचा निधी थेट नागपूरला घेऊन जाण्याचा डाव या राज्य सरकारचा आहे. कोणत्या शहराला किती रक्कम अद्याप पर्यंत स्पष्ट केले नाही. हीच का या सरकारची पारदर्शकता असा टोला देखील त्यांनी लगावला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामध्ये स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि रामवाडी ते वनाज हे दोन मार्ग आहेत. ३१ किमीच्या या दोन मार्गांसाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातील २० टक्के रक्कम राज्य सरकार, २० टक्के रक्कम केंद्र सरकार, १० टक्के रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावा लागणार आहे.

केंद्र सरकारने यंदाच्या अंदाजपत्रकात पुणे मेट्रोसाठी ९५० कोटीची तरतूद  केली आहे, तर राज्य सरकारने पुणे, मुंबई आणि नागपूर या तिन्ही मेट्रो प्रकल्पांसाठी एकत्रित ७१० कोटींची तरतूद केली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विविध कामांची निविदा निघाली असून, पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने केलेली तरतूद त्यासाठी उपयोगी पडणार आहे.पुण्यासह नागरपूर या दोन्ही मेट्रोंचे काम महामेट्रो कंपनीच्या माध्यमातुन केले जाणार आहे.गेल्यावर्षी नागपूर आणि पुणे मेट्रोसाठी १८० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामध्ये, पुण्याच्या वाट्याला ४५ कोटी रुपयांचा निधी आला होता. तसेच आज राज्याच्या अंदाजपत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पुणेकराच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भावना महापालिकेतील विरोधी पक्षांनी केली आहे. याचे पडसाद येणाऱ्या महापालिकेच्या सर्व साधारण सभेत उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.