गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळणार आहे. पुणेकरांसाठी ही बाब म्हणजे एखाद्या पर्वणीपेक्षा कमी नसावी! गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांची कामं समांतर पद्धतीने करण्यात येत आहेत. याआधी वनाज ते रामवाडी या भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आता कोथरूड ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी उद्या केली जाणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. पुणे मेट्रोच्या या टप्प्याची चाचणी उद्या सकाळी ७ वाजता केली जाणार असून त्यावर “संकल्पातून सिद्धीकडे; पुणे मेट्रोची उद्या ट्रायल!” असं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

महापौर म्हणतात…

यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं नमूद केलं आहे. “पुणेकरांनी पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न उद्या पूर्ण होतंय. उद्या सकाळी ७ वाजता कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी होत आहे. कित्येक वर्ष कागदावर धावणारी मेट्रो प्रत्यक्षात धावताना पाहण्याचं पुणेकर म्हणून असलेलं दुसरं सुख ते काय?” असं महापौरांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो मार्गिकांची कामे प्रगतिपथावर आहेत. यातील पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रोची चाचणी एका वर्षांपूर्वी घेण्यात आली. या मार्गाची ४ जुलै रोजी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून पाहणी करण्यात आली. मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची प्रक्रिया महामेट्रोकडून सुरू झाली आहे. पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेअंतर्गत काही भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली आहे. त्यानंतर आता कोथरूड डेपो ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी उद्या ३० जुलै रोजी घेण्यात येणार आहे.